मुंबई- वृद्धानंतर कोरोनाचा धोका हा गर्भवतींना असल्याचे म्हटले जाते. पण मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयाने ही भीती कमी केली आहे. नायर रुग्णालयात आतापर्यंत गर्भवती 325 कोरोनाबाधित दाखल झाल्या असून यातील 198 रुग्णांचे सुखरूप बाळंतपण झाले आहे, तर आतापर्यंत 225 रूग्ण बरे होऊन बाळासह डिस्चार्ज घेऊन घरी परतले आहेत. महत्वाचे म्हणजे सुदैवाने आजपर्यंत एकही गर्भवती कोरोनाबाधित रूग्ण दगावलेला नाही. त्यामुळे नायरचा पॅटर्न यशस्वी ठरल्याची चर्चा आहे.
गर्भवती कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी पालिकेकडून नायरमध्ये विशेष कक्ष उभारण्यात आला. 14 एप्रिलपासून हा कक्ष कार्यरत आहे. हा कक्ष सुरू झाल्यापासून आजपर्यंत येथे 325 रूग्ण दाखल झाले आहेत. रोज येथे रूग्ण येतात. पण जे गंभीर आहेत आणि ज्यांचे बाळंतपण जवळ आहे वा तात्काळ सिजेरियन करावे लागणार असेल अशाच रुग्णांना बेडच्या मर्यादेमुळे दाखल करून घेतले जाते. ज्या रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत आणि ज्यांच्या बाळंतपणाला अजून वेळ आहे, त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठवले जाते, अशी माहिती स्त्रीरोग विभागाच्या नोडल ऑफिसर प्रमुख डॉ. नीरज महाजन यांनी दिली आहे. या विशेष कक्षात रुग्णांची योग्य काळजी घेतली जात असल्याने आतापर्यंत 198 रुग्णांचे सुखरूप बाळंपण येथे झाले आहे. एक तिळ्या आणि 4 जुळ्या बाळांसह 204 बाळांचा जन्म झाला आहे. विशेष म्हणजे ही सगळी बाळं ठणठणीत आहेत. तर 225 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी पाठवण्यात आल्याचेही डॉ महाजन यांनी सांगितले आहे.
कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती सगळ्यांनाच असते. पण गर्भवतीसाठी हा काळ नाजूक असतो. त्यामुळे त्यांना नेहमीच विशेष काळजी घ्यावी लागते. त्यात आता कोरोना आल्याने त्यांना आणखी काळजी घ्यावी लागत आहे. ती त्यांनी घेतली तर कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. गर्भवतीना सातव्या महिन्यापासून नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जावेच लागते. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. यातूनच अशा रुग्णाची संख्या वाढती असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण गर्भवतींनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेतली तर त्यांना लागण झाली तरी त्या बऱ्या होत आहेत, त्यांची बाळंतपण सुखरूप होत आहेत, हे नायरमधील डॉक्टर-आरोग्य कर्मचाऱ्यांनी दाखवून दिले आहे. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना वॉर्डमध्ये काम करणारे डॉक्टर-नर्स-आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण, नायरमधील या कक्षात काम करणाऱ्या एकाही डॉक्टर-नर्स वा आरोग्य कर्मचाऱ्यालाही सुदैवाने संसर्ग झालेला नाही.