मुंबई - ब्राह्मण समाजातल्या तरुणांसाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावे यासह इतर मागण्यांसाठी ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे , अल्पसंख्यांकांचा दर्जा द्यावा, समाजाच्या बदनामी विरोधात कायदा करावा आदी मागण्यांचे निवेदन ब्राह्मण समाजाच्या संघटनांच्या शिष्टमंडळाने आज राज्यपालांना देत सरकारला तशा सूचना कराव्यात, अशी विनंती व राज्यपालांशी चर्चा केली.
ब्राह्मण समाजाने सरकारकडे केलेल्या मागण्या
आर्थिक विकास महामंडळ, इनामी जमीन खासगी मालकीची करुन देणे, पुरोहितांना मानधन देणे, दादोजी कोंडदेव आणि भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचे पुतळे पुनर्स्थापित करणे, प्रत्येक जिल्ह्यात ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधणे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करा, तसेच इनामी जमिनीसंदर्भात अन्याय होत असलेल्या ब्राह्मण शेतकऱ्यांची यादी तयार करावी.
आज राज्यपालांना भेटून ब्राह्मण शिष्टमंडळाने ब्राह्मण समाजाच्या मागण्यांविषयी चर्चा केली. यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मागण्यांकडे सरकारने त्वरित लक्ष घालून मान्य कराव्यात, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवतो असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले या शिष्टमंडळात समस्त ब्राह्मण समाज समन्वयक मनोज कुलकर्णी, मकरंद भिकाजी कुलकर्णी, विश्वजीत दुर्गादास देशपांडे, संजीवनी पांडे, संदेश देशपांडे ( बाजीप्रभू देशपांडे यांचे १२ वे वंशज ), शीतल सदावर्ते, स्मिता आपटे आदींचा समावेश होता.