मुंबई - हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण येत्या 2 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रीमंडळ बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
वाहन चालकांना या महामार्गामुळे मोठा दिलासा - नागपूर ते मुंबईला जोडणाऱ्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच या महामार्गाचा आढावा घेतला होता. दरम्यान, रस्त्याच्या दुतर्फा उभे करायाच्या सोयी सुविधा आणि एक्झिट पॉईंट उभारण्याचे काम सुरू होते. मात्र, आता हे पूर्ण झाले असून पहिला टप्पा येत्या 2 मेपासून वाहनांसाठी खुला केला जाणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण होईल, असेही ते म्हणाले. वाहतुक कोंडीचा सामना करावा लागणाऱ्या वाहन चालकांना या महामार्गामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
महामार्गाचे वैशिष्ट्य - समृद्धी महामार्गाचा काही भाग अरण्यातून जातो आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या रक्षणासाठी आठ ओव्हरपास आणि 76 ठिकाणी जमीनीखालून मार्ग ठेवले आहेत. वन्यजीवांना आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी नॉईस बेरियर्सही बसवण्यात येणार आहेत. वन्यजीवांना ओव्हर पासवरून ये-जा करताना जंगल असल्याचा भास व्हावा, याकरीता खास झाडे लावली आहेत.
हेही वाचा - BJP Polkhol Campaign : भाजपच्या 'पोलखोल' अभियानाचा शिवसेनेला बसणार का फटका? वाचा सविस्तर