मुंबई - मुंबईमधील मेट्रो सिनेमाजवळ वासुदेव बळवंत फडके चौक येथे १५३ वर्षांपूर्वीचे 'फिट्झगेराल्ड दिवा व कारंजा शिल्पाकृती' आहे. त्याचा जीर्णोद्धार मुंबई महापालिकेने केला आहे. त्याचे लोकार्पण आज राज्याचे पर्यटन तसेच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
१५३ वर्षी पुरातन शिल्प -
तब्बल १५३ वर्षे पुरातन असलेले जगातील एकमेव अशा या पुरातन व सुंदर शिल्पाकृतीची मेट्रो सिनेमाजवळील वासुदेव बळवंत फडके चौकात नव्याने उभारण्यात करण्यात आली आहे. मिश्र धातूसह ओतीव लोखंडामध्ये अप्रतिम नक्षीकामासह घडविण्यात आलेल्या 'फिट्झगेराल्ड दिवा व कारंजा शिल्पाकृती' चे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाने संवर्धन व सुशोभिकरण केले आहे. यात सुमारे ४० फूट उंच कारंजा व ७ फूट उंच दिवा समाविष्ट आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागाने या पुरातन शिल्पाकृतीचा जीर्णोद्धार केला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शिल्पाकृती नव्याने उभारण्यात आली आहे.
सन १८६० च्या दशकात सर रुस्तमजी जीजीभॉय या कापसाच्या प्रसिद्ध व्यापाऱ्याने इंग्लंडमधील नॉर्थहॅम्प्टन शहराच्या मार्केट स्क्वेअरमध्ये उभ्या असलेल्या आयझॅक फाउण्टनप्रमाणेच मुंबई शहरासाठी सुंदर दिवा व कारंज्यांची मागणी 'मे. एडवर्ड हॅरिसन बारवेल आणि कंपनी' यांच्याकडे नोंदवली. कालांतराने त्यांच्या विश्वस्तांकडून, तत्कालीन एस्प्लनेड फी फंड समितीने १४ हजार रुपयांना ते खरेदी केले. १८६७ मध्ये मुंबई इलाख्याचे गव्हर्नर सर सॅम्युअल फिट्झगेराल्ड यांच्या गौरवार्थ हे अप्रतिम नक्षीकाम असलेले, मिश्र धातूसह ओतीव लोखंडाचे दिवा व कारंजे उभारण्यात आले. या सुंदर शिल्पाच्या मधोमध ४० फूट उंचीवर गॅसबत्तीने पेटणारा दिवा व सभोवती चार दिवे होते. १८८० च्या दरम्यान मुंबई लगतच्या समुद्रातील जहाजे या दिव्याला मुंबई बंदराचा दीपस्तंभ समजत असल्यामुळे मध्यरात्रीनंतर हा दिवा बंद करण्यात येत असे. या नक्षीदार कारंज्याला त्यावेळी मुंबई जलकामे विभागातर्फे विहार तलावातून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात होता.
इंग्लंडमधील आयझॅक फाउण्टन सन १९६२ मध्ये जमीनदोस्त करण्यात आले. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुरातन वास्तू जतन विभागाच्या माध्यमातून या शिल्पाकृतीचे संवर्धन करुन १५३ वर्षांनी पुन्हा त्याच जागी म्हणजे वासुदेव बळवंत फडके चौकात नव्याने उभारले आहे. सदर संवर्धन करताना पुरातन वास्तू जतन विभागाने वेगवेगळ्या तज्ज्ञांची मदत घेताना थेट इंग्लंडमध्येही संपर्क साधला. तपशिलवार संदर्भ शोधून, सर्व अभ्यास करुन सदर कलाकृतीचे लहान मोठे असे ५८० भाग पूर्वीच्या संदर्भानुसार त्याच ओतीव लोखंडाच्या विटा तयार करून साचे बनवून हे संवर्धन करण्यात आले आहे.