मुंबई - मुंबई महापालिकेने लसीचा तुटवडा होत असल्याने ग्लोबल टेंडर काढण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यासाठी १० पुरवठादारांनी प्रस्ताव पाठवला आहे. त्यापैकी एका पुरवठादाराने माघार घेतल्याने ९ पुरवठादार राहिले आहेत. या ९ पुरवठादारांच्या कागदपत्रांची छाननी येत्या ३ दिवसांत केली जाईल त्यानंतरच कोणाला लसीचा पुरवठा करण्याचे कंत्राट द्यायचे, याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.
हेही वाचा - यंदा वरुण राजाचे होणार दमदार आगमन, 101 टक्के सरासरी पावसाचा अंदाज
दोन वेळा वाढवली मुदतवाढ
लसीच्या पुरवठ्यासाठीच्या ९ संभाव्य पुरवठादारांच्या कागदपत्रांची छाननी येत्या ३ दिवसांत केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. या ९ संभाव्य पुरवठादारांपैकी ७ पुरवठादारांनी स्पुटनिक फाईव्ह या कोविड लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे, तर त्यातीलच एका पुरवठादाराने स्पुटनिक लाईट या कोविड लसीचा देखील पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. तर, अन्य एका पुरवठादाराने मान्यता प्राप्त लसींपैकी जी प्राप्त होईल, त्या लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे.
महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार, तसेच उपायुक्त (विशेष) संजोग कबरे व सहकारी अधिकारी कोविड लस पुरवठा उपलब्ध करून घेण्याबाबतची ही कार्यवाही पार पाडत आहेत. लस पुरवठ्याबाबतच्या या जागतिक निविदांसाठी गेल्या १८ मे आणि २५ मे रोजी मुदतवाढ दिली होती, आता अंतिम मुदतीत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची पडताळणी करण्यात येत आहे.
बारकाईने होणार छाननी
लस पुरवठा करण्यास इच्छुक असलेले पुरवठादार व प्रत्यक्ष लस उत्पादित करीत असलेल्या कंपन्या या दोघांमधील असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अवश्यक आहे. जेणेकरून लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीतपणे होईल, याची खात्री पटेल व किती दिवसात लस साठा पुरवला जाईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करून महानगरपालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सतत पाठपुरावा करीत आहे. सर्व कागदपत्रांची छाननी करून याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
हेही वाचा - म्यूकरमायकोसिसमुळे मुंबईत 'अब तक ५६' रुग्णांचा मृत्यू