मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईतील बार, रेस्टॉरेंटकडून पैसे वसुली करण्यासाठी अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना टार्गेट दिला होता, असे आरोप लावले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून चांदीवाल आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या समिती समोर आज बुधवार (दि.12) रोजी पोलीस उपायुक्त राजू भुजबळ ( DCP Raju Bhujbal cros examined in front of Chandiwal Commission ) यांची उलट तपासणी करण्यात आली. आम्ही अनिल देशमुखांना भेटायला गेलो त्यावेळी संजीव पलांडे यांनी आम्हाला कुठलेही वसुली संदर्भातील टार्गेट दिले नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - Self Test Kit in Mumbai : ३ लाखापैकी ९८ हजार ९५७ चाचण्यांचे अहवाल, इतरांचे अहवाल गायब
देशमुख ( anil deshmukh ) यांचे खासगी सचिव संजीव पलांडे यांचे वकील शेखर जगताप यांनी उपायुक्त भुजबळ ( DCP Raju Bhujbal ) यांची उलट तपासणी घेतली. या वेळी ते म्हणाले की, 1 मार्च ते 10 मार्च 2021 मध्ये मी विधानसभा बंदोबस्ताला होतो. माझी 4 मार्चला नियमित बैठक ज्ञानेश्वरीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत होती. या भेटीवेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटीलसोबत असताना संजीव पलांडे हे मला भेटले. त्यावेळी पैशांसंदर्भात कुणासोबत आणि कोणतीही चर्चा झालेली नव्हती. त्यावेळी गृहमंत्रीही बंगल्यावर नव्हते.
माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेने मला माहिती दिली नाही, असे कधी घडले नाही. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र व्हायरल झाले. त्यात करण्यात आलेल्या आरोपावरून सहआयुक्त मिलिंद भारंबे यांनी मागील वर्षी 20 मार्चला माझी चौकशी केली. एसीपी संजय पाटील यांनी बार, हुक्का पार्लर आणि इतर ठिकाणी केलेल्या कारवाईची वेळोवेळी माहिती मला आणि वरिष्ठांना दिली होती. माझ्या परवानगी शिवाय ते कुठेही कारवाईला जात नव्हते, असेही उपायुक्त राजू भुजबळ यांनी चांदीवाल आयोगासमोर आज उलट तपासणीत सांगितले.
मुंबईतील 1 हजार 750 बारमधून वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत. मुळात त्यावेळी कोरोना संकटामुळे 300 - 350 बार पैकी 170 - 175 बार सुरू होते. यातून कुठलीही वसुली करण्यात आलेली नाही. ही बाब माझ्या प्रतिज्ञापत्रातही आहे. आम्ही अनिल देशमुखांना भेटायला गेलो त्यावेळी संजीव पलांडे यांनी आम्हाला कुठलेही वसुली संदर्भातील टार्गेट दिले नाही. तसेच, या विषयावर चर्चा झाली नाही.
पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांची उद्या पुन्हा चांदीवाल आयोगासमोर उलट तपासणी करण्यात येणार असून, अनिल देशमुख ( anil deshmukh ) यांचे वकील गिरीश कुलकर्णी हे उद्याला उलट तपासणी करणार आहे. तसेच, सचिन वाझे यांच्या वकिलाकडून देखील उलट तपासणी उद्याला करण्यात येणार आहे.