मुंबई - ‘तौत्के' नावाचे चक्रीवादळ मुंबई नजीकच्या समुद्रातून जाणार आहे. उद्या रविवारी याचा परिणाम दिसून येणार आहे. ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून मध्यम तसेच काही ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सर्व सरकारी यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईकर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
आढावा बैठक -
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात ‘तौत्के’ नावाचे चक्रीवादळ मुंबई नजीकच्या समुद्रातून जाणार असून त्याचा प्रभाव हा काही प्रमाणात मुंबईतील वातावरणावर होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक १५ व १६ मे २०२१ रोजी वेगाने वारे वाहण्यासह पर्जन्यवृष्टी देखील होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश यापूर्वीच दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर करण्यात आलेली तयारी व सुसज्जता आणि इतर संबंधित यंत्रणांनी केलेली तयारी याचा आढावा मुंबई उपनगरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे व मुंबई शहर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
रविवारी वाऱ्याचा वेग वाढणार -
बैठकीच्या सुरुवातीला भारतीय हवामान खात्याच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ‘तौत्के’ या चक्रीवादळाबद्दल थोडक्यात माहिती दिली. या अनुषंगाने त्यांनी सांगितले की, या चक्रीवादळाचा बृहन्मुंबई महानगरपालिका परिसराला धोका नाही. तथापि, ते मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले. यानुसार दिनांक १५ मे रोजी मुंबईतील वाऱ्याचा वेग हा ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. तर रविवार, दिनांक १६ मे रोजी सायंकाळपासून वाऱ्याचा वेग वाढून तो ताशी ६० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. तर त्याच दिवशी काही ठिकाणी हा वेग ताशी ८० किलोमीटरपर्यंत जाऊ शकेल, अशीही माहिती या बैठकीदरम्यान भारतीय हवामान खात्याद्वारे देण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्या आवश्यक त्या साधनसामुग्रीसह सुसज्ज असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली.
घराबाहेर पडू नका -
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; काही ठिकाणी जोराचा पाऊस पडू शकतो असाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज लक्षात घेता सदर दोन्ही दिवशी नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईतील चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या नजीकचा परिसर इत्यादी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये. तसेच या अनुषंगाने मुंबई पोलीस व अग्निशमन दल यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
धोकादायक झाडे, होर्डिंग हटवा -
भारतीय हवामान खात्याद्वारे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना आणि पाण्याचा वेग लक्षात घेऊन वरळी - वांद्रे परिसराला जोडणाऱ्या राजीव गांधी सागरी सेतूवरील वाहतूक सुरु ठेवण्याचा अगर बंद करण्याचा निर्णय परिस्थितीसापेक्ष घेतला जाईल, असे मुंबई पोलीसांद्वारे सांगण्यात आले. मुंबई परिसरातील धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याचे काम झाले असल्याची माहिती बैठकीदरम्यान देण्यात आली. मुंबई परिसरात असणाऱ्या होर्डिंगपैकी जे होर्डिंग्ज धोकादायक परिस्थितीत आढळून येतील ते तातडीने हटवावेत असेही निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना -
रेल्वेच्या स्तरावर आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात आल्या असून उपनगरीय रेल्वे सेवा ही सदर दोन्ही दिवशी सुरू राहील अशी माहिती रेल्वेद्वारे देण्यात आली. मुंबई मेट्रो, रस्ते विभाग, सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) एम. एम. आर. डी. ए. इत्यादींद्वारे ज्या ज्या ठिकाणी पायाभूत सोयी सुविधांविषयी कामे सुरू आहेत, अशा सर्व ठिकाणी सुयोग्यप्रकारे व तातडीने बॅरिकेड्स लावून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाणी साचू नये म्हणून पंपाची व्यवस्था -
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सखल भागात पाणी साचू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व ठिकाणी उदंचन संच बसविण्यात आले असून ते सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करवून घेण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्तव्यावर उपस्थित असणारे कामगार कर्मचारी व अधिकारी यांनी 'रिफ्लेक्टिव्ह जॅकेट' परिधान करण्याच्या सूचना
वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी -
बेस्ट इलेक्ट्रिक सप्लाय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या विद्युत वितरण करणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या स्तरावर आवश्यक त्या मनुष्यबळासह आणि सामग्री सहज सुसज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. जेणेकरून कोणत्याही परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तो लवकरात लवकर पूर्ववत करता येऊ शकेल.
तात्पुरत्या निवाऱ्याची सोय -
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांच्या आयुक्तांना त्यांच्या- त्यांच्या स्तरावर आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्री सह सुसज्ज व कार्यतत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्र किनाऱ्यालगत व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यकतेनुसार अन्यत्र हलविणे गरजेचे झाल्यास, त्या दृष्टीने तात्पुरते निवारे यापूर्वीच निश्चित करण्यात आले आहेत. या तात्पुरत्या निवाऱ्यांच्या ठिकाणी अन्न व पाण्याची सुविधा व इतर आवश्यक सुविधा आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.