मुंबई - राज्य विधिमंडळात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाची कार्यवाही सुरू असून, त्यासाठी असलेल्या विशेषाधिकार समितीला यासाठी अहवाल सादर करण्यासाठी पुढील अधिवेशनापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जाहीर केला. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि काँग्रेसचे सदस्य भाई जगताप यांच्यात सभागृहात जोरदार खडाजंगी झाली.
दरेकर यांनी अर्णब गोस्वामी यांची बाजू घेत विशेषाधिकार समितीला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्याची गरज नाही, यासाठी सर्वोच्च न्यायालयात गोस्वामी यांनी दाद मागितली असल्याचे सांगितले. तसेच सरकारने केवळ राजकीय अभिनेवेशाने ही कारवाई केली असल्याचा दावा करत दरेकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
गोस्वामींवरून दरेकर-भाई जगताप यांच्यात खडाजंगी
सरकरकडून अर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाई ही विशेषाधिकारच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही मुदतवाढ न देता हा विषय सभापतींनी आपल्या स्तरावरच निकाली काढावा, अशी मागणी केली. त्यावर काँग्रेसच्या भाई जगताप यांनी जोरदार आक्षेप घेतला. दरेकर जे सांगत आहेंत ते अर्धसत्य असल्याचे जगताप यांनी ठासून सांगितले. ज्या कंगना रणौतने मुंबईला पाकिस्तान म्हणून संबोधले, तिने पाकिस्तानची तुलना मुंबईशी केली, त्यांच्या मागे तुम्ही उभे राहून गळे काढता काय, असा सवाल करत विरोधकांना धारेवर धरले. यामुळे विरोधकांनी सभागृहात काही वेळ गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत सभापतींनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.