मुंबई - देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून संसर्ग पसरू नये यासाठी मुंबई -दिल्ली विमानसेवा आणि रेल्वे सेवा पुन्हा एकदा बंद होण्याची शक्यता आहे. राज्य स्तरावर याबाबत उच्चस्तरीय बैठक होणार असून याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी मंत्रालयात जोरदार चर्चा आहे.
दिवाळीत अनियंत्रित गर्दी -
यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेत असून याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. केंद्राने निर्देशित केलेल्या अनलॉकमुळे मोठ्या शहरांमध्ये वर्दळ वाढली आहे. त्यातच दिवाळी सारख्या सणासुदीत नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने कुणाचा प्रादुर्भाव वाढ असून राजधानी दिल्लीत एकाएकी रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येईल की काय अशी शंका व्यक्त होत आहे. यापार्श्वभूमीवर मोठ्या महानगरात प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी उपाययोजना करणे महत्वाचे मानले जात आहे. त्यानुसार दिल्ली-मुंबई वाहतूक बंद करता येईल का ? याबाबत उच्चस्तरीय विचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ -
दिवाळीनंतर राजधानी दिल्लीत ६ ते ८ हजार रुग्णांची दिवसाला भर पडत आहे. तर महाराष्ट्रात ही कमी झालेला रुग्णांचा एकदा वाढत आहे . राज्यात दरदिवशी ४ ते पाच हजार रुग्ण वाढत आहेत . मुंबई शहरात ही गेल्या तीन दिवसात नऊशे ते एक हजार रुग्नांच्या संख्येत वाढ होत आहे. या स्थितीत कोरोनाची संभाव्य दुसरी लाट टाळण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत असून दिल्ली-मुंबई रेल्वे आणि विमानसेवा बंद करण्याचा विचार त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद -
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगभरात आणि भारतात दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती. थंडीही सुरू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणावरून येत्या २३ नोव्हेंबरपासून मुंबईमधील शाळा सुरू करणे शक्य नसल्याचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत मुंबईत शाळा सुरू करणे शक्य नसल्याने नव्या वर्षात म्हणजेच १ जानेवारीपासून मुंबईतील शाळा सुरू करता येऊ शकतात, असे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी म्हटले आहे.