मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, धारावीतील प्रत्येकाची प्राथमिक चाचणी करायला मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. धारावीतील खासगी डॉक्टर्स आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन या चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी धारावीतील मुकुंद नगर आणि आजूबाजूच्या परिसरात स्क्रिनिंगला सुरुवात करण्यात आली.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : रुग्णालयच बनलंय कोरोनाचे हॉटस्पॉट ? बीपीटी रुग्णालयातील 250 कर्मचाऱ्यांच्या जीवाशी होतोय खेळ !
स्क्रिनिंग दरम्यान खासगी डॉक्टर्स आणि पालिका कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक धारावीतील प्रत्येक घरात जाऊन, डिजिटल थर्मामीटरच्या साहाय्याने प्रत्येकाच्या शरीराच्या तापमानाची नोंद करत आहेत. तसेच नुकताच केलेला प्रवास (ट्रॅव्हल हिस्टरी) आणि इतर प्रश्न विचारून नागरिकांकडून माहिती गोळा केली जात आहे. या स्क्रिनिंग दरम्यान संशयास्पद (ज्यांना कोरोना किंवा संबंधित लक्षणे जाणवत आहेत) नागरिकांची माहिती त्वरित पालिकेला देऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीत बाधित आढळणाऱ्या नागरिकांना गरजेनुसार, अलगीकरण, विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल व रुग्णांवर उपचार केले जातील.
हेही वाचा.... 'प्लाझ्मा थेरपी' सुरू करण्यास केरळ तयार; रक्तदानाचे नियम शिथील करण्याची प्रतीक्षा..
स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांनी स्थानिक डॉक्टरांना आवाहन केले होते. त्याला डॉक्टरांनी प्रतिसाद देत, इंडियन मेडिकल कौन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या मार्फत धारावीतील खासगी डॉक्टरांनी पालिका प्रशासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखवली. त्यानुसार सुमारे 150 खासगी डॉक्टर्स पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने येत्या 10-12 दिवसांत संपूर्ण धारावीचे स्क्रिनिंग करणार आहेत, अशी माहिती खासदार राहुल शेवाळे आणि डॉक्टरांनी दिली.