मुंबई - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. त्यातच नवी दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'तबलिगी जमात मरकझ' या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या नागरिकांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या नागरिकांपासून देशातील विविध भागात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने एकच खळबळ माजली आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातूनही तब्बल १४०० लोक गेले होते, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचा... देशात चर्चा ! हे 'मरकझ' आणि 'तबलिगी जमात' म्हणजे नेमकं काय?
राज्यातून 'तबलिगी जमात मरकझ' या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या नागरिकांचा जिल्हानिहाय तपशील...
जालना
दिल्लीच्या निजामुद्दीन मरकझमध्ये तबलिगी जमातच्या कार्यक्रमात जालना जिल्ह्यातील 5 जण सामील झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. यामध्ये घनसावंगी तालुक्यातील 3 जणांचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे.
औरंगाबाद
दिल्ली येथील हजरत निजामुद्दीनस्थित मरकझ येथील तबलिघ-ए-जमातमध्ये गेलेल्या अनेक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यावर सरकारने या जमातीमध्ये गेलेल्या लोकांचा शोध सुरू केला आहे. त्यानुसार औरंगाबादचे 47 लोक सहभागी झाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा- Corona Virus : तबलीग जमात आणि त्याचा इतिहास काय आहे जाणून घ्या सविस्तर...
धुळे
दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ या कार्यक्रमाचे धुळे जिल्ह्याशी कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. याठिकाणी झालेल्या धार्मिक कार्यक्रमात धुळे जिल्ह्यातील काही मुस्लिम धर्मीय बांधव सहभागी झाले होते. जिल्ह्यातील तब्बल १५ नागरिकांचा यात समावेश असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या संशयितांचे अहवाल काय येतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. मात्र, या बातमीने धुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
परभणी
दिल्ली येथील निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परभणी शहरातील 3 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील 5 ठिकाणच्या 5 व्यक्तींना त्यांच्या घरी होम-क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्वांच्या 'स्वॅब'चे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली आहे.
जळगाव
जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातील लोकांमध्ये कोरोना आढळून आला आहे. त्यामुळे त्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. अशातच जळगाव शहरातील 10 जण या कार्यक्रमात सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हिंगोली
दिल्ली येथील निजामुद्दिनमध्ये झालेल्या तबलिगी जमात मरकझ या कार्यक्रमात सहभागी असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची घटना समोर आली. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून १२ नागरिक गेले होते, त्यापैकी एक जण परतला असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. आज अहवाल येईल
वर्धा
दिल्ली येथील निजामुद्दिनमध्ये झालेल्या तबलिगी जमात मरकझ या कार्यक्रमाला वर्ध्यातून 22 जण गेले असल्याची यादी जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. यातील 15 लोक अद्याप जिल्ह्यात आले नाही. तर फक्त 7 जण वर्ध्यात आले. त्यापैकी एक आणि त्याच्या संपर्कात आलेले कुटुंबीय यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेट करून ठेवले आहेत. इतर 6 जन हे घरात क्वारंटाईन केले आहे.
चंद्रपूर
दिल्लीच्या तबलिग जमात मरकझ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 39 जण सहभागी होते. त्यातील चौघांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित 35 जणांचे फोन बंद असून त्यांचा शोध सुरू आहे.
कोल्हापूर
दिल्लीतील 'तबलिगी जमात मरकझ' या कार्यक्रमानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रासह कोल्हापूरातील व्यक्तींचा सुद्धा सहभाग होता, अशी माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्यांचा शोध लावला आहे. कोल्हापूरच्या 19 जणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यापैकी 9 जणांना विविध राज्यांमध्ये होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर कोल्हापूरात परत आलेल्या 10 जणांचा शोध घेऊन त्यांना देखील जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने संस्थात्मक क्वॉरंटाईन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
सोलापूर
दिल्ली येथील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या मरकझ या धार्मिक कार्यक्रमात सोलापूरातील 17 पैकी 11 जणांना प्रशासनाने जिल्हा रुग्णालयामध्ये भरती केले आहे. 11 जणांना कोरोना वार्डात दाखल केले असून, त्यांचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
अहमदनगर
दिल्ली येथील निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या मरकझ ला सोलापूरातील 17 पैकी 11 जणांना प्रशासनाने जिल्हा रुग्णालयामध्ये भरती केले आहे. 11 जणांना कोरोना वार्डात दाखल केले असून, त्यांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
रत्नागिरी
दिल्ली येथील निजामुद्दीन मरकझमध्ये रत्नागिरीतील तीन नागरिक सहभागी झाले होते. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. त्या तिघांपैकी एकाला मुंबईत आणि एकाला आग्रा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर एकावर जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत, अशी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
पुणे ( पिंपरी चिंचवड )
दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून ३२ जण शहरात आले होते. पैकी २२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आरोग्य आणि पोलीस प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, रात्री सहा जणांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला असून आज दोन जण पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
सांगली
दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या मरकझमधून सांगली जिल्ह्यातील ३ जण परतले असल्याची माहिती समोर आली आहे. आधीच इस्लामपूर येथे 25 कोरोना रुग्ण आढळल्याने चक्रावलेले प्रशासन यामुळे हबकून गेले आहे. जिल्हा प्रशासनाने दिल्लीच्या मरकझ येथून परतलेल्या त्या तिघांचा तातडीने शोध सुरू केला. यातून एकूण ११ जणांचा मरकझशी प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष संबंध आढळून आला आहे.
नागपूर
दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातील लोकांमध्ये कोरोना आढळून आला आहे. त्यामुळे त्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. नागपूरमधूनही या कार्यक्रमाला 54 जण गेले होते. त्यांना क्वारंन्टाईन केले आहे.
नाशिक
दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमात नाशिक शहरातील 50हून आधिक नागरिक सहभागी झाल्याची माहिती, जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. त्यातील 21 जणांचा शोध घेण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले असून त्यांना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे.
अकोला
दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन येथील तबलिग-ए- जमातमध्ये अकोल्यातील 10 जण सहभागी झाल्याची शक्यता आहे. या 10 जणांचा पोलिसांनी शोध घेतला असून यामधील चौघांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. तसेच यातील 1 जण परदेशात गेला असून दोघे दिल्लीला गेले असल्याची माहिती आहे. तसेच इतर दोघे हे मुंबईचे असल्याची माहिती, पोलीस विभागाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या बैठकीत दिली.
पुणे
दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातील लोकांमध्ये कोरोना आढळून आला आहे. त्यामुळे त्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या 182 जणांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे. यामध्ये पुणे विभागात 106 जण आढळले आहेत. तर उर्वरीत नागरिकांचा शोध सुरू असल्याची माहिती, पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
यवतमाळ
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. त्यातच दिल्लीतल्या निजामुद्दीन दर्ग्यात झालेल्या 'मरकझ' या धार्मिक कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं कोरोनाबद्दल किती बेफिकिरी दाखवली जात आहे, हे समोर येत आहे. निजामुद्दीन येथील संमेलनात यवतमाळ जिल्ह्यातील 12 जण सहभागी झाले होते. या लोकांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली आहे.
वाशिम
दिल्लीतील हजरत निजामुद्दिन परिसरात तबलिगी मरकझ जमातीच्या कार्यक्रमातून परतलेल्या अनुयायांचा सर्वत्र शोध सुरू आहे. यातच मंगरुळपीर येथे 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ते दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात उपस्थित होते. संबंधित अनुयायांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच अन्य 23 जणांचा शोध सुरू आहे.
परभणी
दिल्ली येथील निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या परभणी शहरातील 3 व्यक्तींचा 'कोरोना' विषाणुच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्या संपर्कात आलेल्या जिल्ह्यातील 5 ठिकाणच्या 5 व्यक्तींना त्यांच्या घरी होम-क्वारंटाईन करून त्यांचेही 'स्वॅब' नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
बुलडाणा
दिल्ली येथील निजामुद्दीन मरकजमध्ये जिल्ह्यातील १७ नागरिक सहभागी झाले होते. ही माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने या १७ नागरिकांचे विलगीकरण केले आहे. या नागरिकांमध्ये कोरोना विषाणूची कुठलीही लक्षणे दिसून आली नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, विलगीकरण केलेल्या नागरिकांवर प्रशासनाची करडी नजर आहे.
रायगड
राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकझ या धार्मिक कार्यक्रमासाठी तबलिगी समुदायातील अनुयायांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच धार्मिक कार्यक्रमात रायगड, ठाणे आणि इतर जिल्ह्यातील 42 जणांनी हजेरी लावली होती. रायगडमधील 14 नागरिकांना या ठिकाणी सहभाग घेतला होता.