मुंबई - शहर परिसरात आटोक्यात आलेला कोरोना वाढत असून मुंबईतील बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळकनगर आदी भाग नव्याने कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने ६१ झोपडपट्ट्या आणि चाळी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहेत. तर ५४५ इमारती सील केल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मागील ११ महिन्यांपासून राज्य व मुंबई महापालिकेचा कोरोनाशी लढा सुरू आहे. घरोघरी सर्वेक्षण, आरोग्य शिबीर, नियमित तपासण्या, रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा तत्काळ शोध घेऊन विलगीकरण, प्रतिबंधित क्षेत्र, इमारती सील करून कठोर अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवून प्रभावी उपाययोजना आदींमुळे कोरोना आटोक्यात आणण्यास पालिकेला यश आले. डिसेंबरनंतर नवीन वर्षाच्या प्रारंभापासून कोरोना उतरणीला लागला. रोज २६०० त २८०० पर्यंत सापडणारे कोरोना रुग्ण २ फेब्रुवारीला ३३४ वर आले. कोरोना आटोक्यात आल्यानंतर टप्प्या- टप्प्याने 'अनलॉक' प्रक्रिया सुरू झाली. राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मर्यादित वेळेत लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र, गर्दी वाढल्याने आठवड्याभरातच मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ३३४ वर असलेली रुग्णसंख्या दुपटीने वाढून ७५१ वर पोहचली. मुंबईतल्या काही भागात रुग्णांची संख्या वाढली असून बोरीवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी भाग कोरोनाचे नवे हॉटस्पॉट म्हणून समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. सरकारच्या नियमांचे पालन न करणा-या काही सोसायट्यांना पालिकेने नोटिस बजावल्या असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. लॉकडाऊनमध्ये शिथिलथा दिल्यावर नागरिकांकडून मास्कचा, सॅनिटायझर वापर न करणे, गर्दीच्या ठिकाणी कोविडच्या नियमांचे पालन न करणे, रेल्वेमधून प्रवास करताना मास्कचा वापर न करणे याकारणाने रुग्ण संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.
या विभागात वाढतेय रुग्णांची संख्या -
मुंबईतील बोरीवली आर सेंट्रल भागात सर्वाधिक रुग्ण संख्या असून ती २२ हजार ४९४ पर्यंत पोहचली आहे. अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी पश्चिम, विलेपार्ले पश्चिम के वेस्ट या विभागात कोरोना रुग्ण संख्या २० हजार ८९१ वर पोहचली आहे. कांदिवली, चारकोप या आर साऊथ या विभागात १९ हजार ०६७ कोरोना रुग्ण आहेत. मालाड, मनोरी, मारवे, अक्सा, मढ या पी नॉर्थ या विभागात एकूण १८ हजार ९५४ कोरोना रुग्ण आहेत. अंधेरी पूर्व के ईस्ट या विभागात एकूण १८ हजार ६९६ रुग्ण आहेत. मुलुंडच्या टी विभागात एकूण १६ हजार १८२ रुग्ण आहेत.
येथे कंटेन्मेंट झोनची संख्या अधिक -
मुंबईत मुलुंड टी विभागात १७१, घाटकोपर एन विभागात १४२, आर सेंट्रल ४३, कुर्ला एल विभागात ३६, चेंबूर एम वेस्ट विभागात ३५, सांताक्रूझ एच ईस्ट विभागात २६, एम ईस्ट विभागात २१ इमारती सील आहेत. तर भांडुप पवई विक्रोळीच्या एस विभागात १०, घाटकोपर एन विभागात १०, कुर्ला एल विभागात ८, खार एच ईस्ट विभागात ६, चेंबूर एम ईस्ट विभागात ५, तर मुलुंड टी विभागात ४ झोपडपट्ट्या आणि चाळी कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित केल्या आहेत.
मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने -
मुंबईत कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने मुंबई पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे. राज्य सरकारने नुकतीच आढावा बैठक घेतली आहे. या बैठकीत नियम पाळा अन्यथा लॉकडाऊन लावण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. कोरोना संदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करावी असे आदेश सर्व महापालिका, पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाला दिला आहे. मुंबई महापालिकेनेही कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये मास्क न घालता प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आता कारवाई केली जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरत नाहीत अशा लोकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
महापौरांकडून जनजागृती -
नागरिकांकडून नियमांची अंमलबजावणी केली जात नसल्याने कोरोना वाढत आहे. याची दखल खुद्द मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतली आहे. आज महापौरांनी भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असा लोकल ट्रेनने प्रवास केला. यावेळी प्रवाशांची संवाद साधत प्रवासादरम्यान मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच फेरीवाले, दुकानवाले लोकांच्या नेहमीच संपर्कात येतात. फेरीवाले, दुकानवालेही कोरोना पसरवू शकतात यासाठी त्यांनीही मास्कचा वापर करावा असेही आवाहन महापौरांनी केले. यावेळी मुंबईत लॉकडाऊन नको असेल तर मुंबईकरांनी मास्कचा, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे.