मुंबई - मागील कित्येक महिन्यांपासून तमाम भारतीय ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो दिवस अखेर आता आज उजाडणार आहे. देशभरात लसीकरण मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने तयारी केली आहे. राज्यातील २८५ केंद्रांवरून आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लस देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या लसीकरणासाठी राज्यभरातील सर्व केंद्र सज्ज झाले आहेत. प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठी परवानगी दिलेली कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन ही लस देण्यात येणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यत आरोग्य कर्मचाऱ्यांना मेसेज पाठविण्याचे काम सुरू होते. या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीला किती वाजता, कोणत्या केंद्रावर, कुठल्या कंपनीची लस दिली जाणार याची माहिती देण्यात आल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
![शीतपेटीत लस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-05-7209214-corona-vaccination-state-mohim_15012021211502_1501f_1610725502_698.jpeg)
हेही वाचा-नांदेड: प्रथम 17 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार कोरोनाची लस
कूपर आणि जालना जिल्हा रुग्णालयातील लसीकरणाची माहिती मोदी घेणार-
डॉ. व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार एका लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी ५ जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील कूपर हॉस्पिटल, मुंबई आणि जालना जिल्हा रुग्णालयातील लसीकरण सत्राची पंतप्रधान दूरचित्रवाणीद्वारे माहिती घेणार आहेत. त्यासाठी येथे ऑनलाइनसाठीची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तर लसीकरणाच्या सुरुवातीसाठी राज्यातील सर्व २८५ केंद्रांवर वेबकास्टची सोय करण्यात आली आहे.
![कोरोना लसची साठवणूक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-05-7209214-corona-vaccination-state-mohim_15012021211502_1501f_1610725502_518.jpg)
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत लसीकरण कार्यक्रम होणार सुरू
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना उद्या १६ जानेवारीपासून लसीकरण केले जाणार आहे. या लसीकरणाची सुरुवात मुंबईच्या वांद्रे येथील बीकेसी कोविड सेंटर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता केली जाणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी नुकतेच दिली आहे.
हेही वाचा-मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लसीकरणाला सुरुवात
कोविशिल्ड आणि कोव्हक्सिन दोन्ही लसी दाखल
राज्याला कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे ९.६३ लाख डोसेस आणि कोव्हॅक्सिन लशीचे २०,००० डोसेस प्राप्त झालेले आहेत. ते राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात आले आहेत. कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील ६ ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ वैद्यकीय महाविद्यालये (मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर) आणि २ जिल्हा रुग्णालयांचा (पुणे आणि अमरावती) समावेश आहे. दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत लसीकरण केले जाईल.
कोविन अॅपचे उद्घाटन होण्याची शक्यता-
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविन (Co-WIN) व्हॅक्सिनेशन इंटेलिजन्स नेटवर्क या अॅपचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. कोरोना लसीकरणाचे व्यवस्थापन करण्यासाठी कोविन हे अॅप तयार करण्यात आले आहे. लस पुरवठा, साठवण, लसीकरणाची माहिती आणि आकडेवारी या गोष्टींचे व्यवस्थापन या अॅपद्वारे करता येणार आहे.
जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम -
पंतप्रधान मोदी आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाची सुरूवात करत आहेत. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असणार आहे. त्यामुळे पोलीओ लसीकरण कार्यक्रमही ३१ जानेवारीला पुढे ढकलण्यात आला आहे, असे आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच म्हटले आहे. कोरोना लसीकरणासाठी देशभरात २ हजार ९३४ बुथ सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यातील काही लाभार्थ्यांशी मोदी संवाद साधणार आहेत. आज देशातील सुमारे ३ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होण्याचे सरकारने उद्दिष्ट निश्चित केले आहे.