मुंबई - अमली पदार्थ बाळगण्याच्या गुन्ह्यांमध्ये एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आरोपीला कोरोना झाल्याचे समोर आल्यावर त्याला मुंबईतल्या जीटी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, हा आरोपी रुग्णालयातून पळून गेल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत आहे. छोटू लालमन वर्मा (25) असे आरोपीचे नाव आहे.
अमली पदार्थांच्या गुन्ह्यात अटक
छोटू लालमन वर्मा (25) याला भायखळा पोलिसांनी अमली पदार्थांचे सेवन व अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. या संदर्भात भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याची मेडिकल टेस्ट करण्यात आली होती. त्यात त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आरोपीला जीटी रुग्णालयामध्ये कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.
कोविड पसरण्याची भीती
कोविड सेंटरमध्ये पोलिसांना आरोपी सोबत थांबण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे कोविड सेंटरच्या बाहेर दोन सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले होते. मात्र 4 नोव्हेंबर रोजी पहाटे हा आरोपी कोविड सेंटर मधून पळून गेला. याची महिती सुरक्षा रक्षकांकडून पोलिसांना देण्यात आली असून आरोपीचा शोध सुरू आहे. हा कोविड पॉझिटिव्ह आरोपी इतरांच्या संपर्कात आल्यास कोविड पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा- जिंतूर : विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या
हेही वाचा- अट्टल दुचाकी चोरटा एलसीबीच्या जाळ्यात; चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत