मुंबई : देशातील कोरोना परिस्थिती लक्षात घेता 'एक देश, एक निती' हा कार्यक्रम ठरवण्याची गरज आहे. नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. भाजप शासित उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट केवळ जाहिरातींमध्ये असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
सर्वपक्षीय बैठक बोलावून निर्णय घ्यावा
उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये शव दाहिन्यांमध्ये जात नाही, तर नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. ही परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एक नीती बनवली नाही तर किमान दोन वर्षे कोरोना देशातून हद्दपार होणार नाही अशी भीती व्यक्त करतानाच मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि नीती ठरवावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
कोरोना स्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी
केंद्र सरकारला कोरोना परिस्थिती हाताळता येत नाही. याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. देशातील सात हायकोर्टांनी वेगवेगळे आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टानेही टास्क फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. जी कामे केंद्र सरकारला करायची आहेत, ती केंद्र सरकारकडून होत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडतंय असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
जाहिरातबाजीऐवजी कोरोना नियंत्रणासाठी पैसे खर्च करा
भाजप शासित उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट जाहिरातीमध्ये आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करताय तेवढे पैसे कोरोना नियंत्रणासाठी खर्च केले असते तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.