मुंबई - गेल्या 4 महिन्यांपासून देशातील कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेले शहर म्हणजे मुंबई. मुंबईत दिवसाला दोन ते अडीच हजार रूग्ण आढळत होते. तर रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी होत्या. पण आता मात्र याउलट चित्र निर्माण झाले असून, हे चित्र दिलासादायक आहे. मुंबईतील रूग्ण दरवाढीचा वेग प्रचंड मंदावला असून, तो 0.97 टक्क्यांवर गेला आहे. तर दुसरीकडे आजच्या घडीला (30 जुलै) 10 हजार 437 बेड रिक्त आहेत.
एकूणच मुंबईत आता हळूहळू कोरोना नियंत्रणात येत असून, हे आशादायी चित्र आहे. पण लस येत नाही तोपर्यंत कोरोनाचे संकट कायम राहणार असल्याने मुंबईकरांनी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
मे-जून महिन्यात मुंबईत 1500 ते 2000 रूग्ण दिवसाला आढळत होते. पण जुलैमध्ये मात्र रूग्णदरवाढीचा वेग मंदावला आहे. त्यामुळेच रूग्ण दरवाढीचा वेग आता 1 टक्क्यांच्याही खाली आला असून, तो 0.97 टक्क्यांवर गेला आहे. 30 जुलैपर्यत मुंबईत 20 हजार 158 रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. यातील 10 हजार 861 रूग्ण विविध रुग्णालयात, कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून, उर्वरित लक्षणे नसलेले रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्याचवेळी गंभीर रुग्णांची संख्याही कमी झाली असून, आता मुंबईत केवळ एकूण अॅक्टिव्ह रुग्णांच्या 6 टक्के रूग्ण गंभीर आहेत. अंदाजे 1 हजार 175 रूग्ण गंभीर आहेत. तर अॅक्टिव्ह रुग्णांच्या 67 टक्के रुग्ण म्हणजे 13 हजार 519 रुग्ण लक्षणे नसलेले असून, 27 टक्के म्हणजे 5 हजार 426 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत.
मुंबईत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची उपलब्धता मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आली होती. पण आता मात्र, परिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळेच 21 हजार 298 बेडपैकी 10 हजार 437 बेड रिक्त आहेत. तर 10 हजार 861 रुग्णांनी व्यापले आहेत. कोविड रुग्णालयात एकूण 16 हजार 412 बेड असून त्यातील 9 हजार 218 बेड रुग्णांनी व्यापले असून 7 हजार 194 बेड रिक्त आहेत. तर कोविड सेंटरमधील 4 हजार 886 बेडपैकी 3 हजार 243 रिक्त असून 1 हजार 643 बेड रुग्णांनी व्यापले आहेत. यात मोठी दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत आयसीयू बेडची मोठ्या संख्येने गरज लागेल असे तज्ज्ञांकडून सांगितले जात होते. पण आता उलट चित्र आहे. आजच्या घडीला मुंबईत 199 आयसीयू बेड रिकामे आहेत. तर 5 हजार 49 ऑक्सिजन बेड तर 114 व्हेंटिलेटर बेड रिक्त आहेत.
एकीकडे रुग्ण कमी होत असून गंभीर रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर 76 टक्क्यांवर गेला असून रूग्ण दुपटीचा दर 72 दिवसांवर गेला आहे. दुसरीकडे मुंबई हर्ड इम्युनिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण यासाठी बराच वेळ लागणार असून, त्याआधीच लस येईल अशी माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे. मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या 70-75 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्यास हर्ड इम्युनिटी तयार होईल. त्यासाठी वेळ आहे. एकूणच रूग्ण कमी झाले असले तरी आणि हर्ड इम्युनिटीकडे वाटचाल सुरू झाली असली तरी कोरोनाचे संकट आहे तसेच आहे. तेव्हा पहिल्या दिवसापासून आपण जी काळजी घेत आहोत ती काळजी मुंबईत लस उपलब्ध होईपर्यंत घ्यायची आहे, हे डोक्यात पक्के करणे हीच आजची गरज असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.