मुंबई - मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षात मुंबईकरांच्या सेवेत दुसरी रोरो बोट दाखल होणार असून जलमार्ग वाहतुकीला आणखी चालना मिळणार आहे. दुसरी रोरो बोट मुंबई ते काशिददरम्यान धावणार असून सध्या या सेवेसाठी काशिद बंदरावर जेट्टी उभारण्याचे काम सुरू झाले असून यावर्षाच्या अखेरीस कामपूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबईकर आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दुसरी बोट लवकरच
सागरमाला उपक्रमांतर्गत देशातील समुद्रकिनार्यांचा उपयोग करून जलवाहतुकीला प्राधान्य देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे. त्यानुसार भाऊचा धक्का ते मांडवा दरम्यान रो रो बोट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. ही रो रो बोट सप्टेंबर 2018मध्ये सुरू होणार होती. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे रखडली. अखेर 15 मार्च २०२०रोजी कोरोनाच्या सावटातच ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि खबरदारी म्हणून ही सेवाही दुसऱ्याच दिवशी बंद करण्यात आली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच प्रवाशांसाठी रोरो बोट पुन्हा सुरू झाली आहे. या रो रो बोटीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षात मुंबईकरांचा सेवेत दुसरी रोरो बोट दाखल होणार असून ही रोरो बोट मुंबई ते काशिद दरम्यान धावणार आहे. सध्या या सेवेसाठी काशिद बंदरावर जेट्टी उभारण्याचे काम सुरू झाले असून यावर्षाच्या अखेरीस कामपूर्ण होणार आहे.
काशिदला जाणाऱ्या पर्यटकांना होणार फायदा
सद्यस्थितीत मुंबईवरून काशिदला जाण्यासाठी मुंबईकरांना अलिबाग मार्गे रस्त्यानेच जावे लागते. खराब रस्ते, वाहतूककोंडीचा त्रास यामुळे या प्रवासात तब्बल 4 ते 5 तासाचा कालावधी लागतो आणि तितकाच वेळ परतीच्या प्रवासाला लागत असल्याने पर्यटक काशिदला जाणे टाळतात. आता या रोरो बोटीमुळे सागरी मार्गाने जाण्याकरिता फक्त 2 तास लागणार आहेत. त्यामुळे पर्यटकांचा वेळसुद्धा वाचणार आहे. तसेच काशिदला, परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून पर्यटकांना सागरी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. ही बोट मार्च २०२२मध्ये पर्यटक आणि मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती सागरी महामंडळाकडून सांगण्यात आली आहे.
जेट्टीचे काम युद्धपातळीवर
समुद्राच्या लाटा थोपविण्यासाठी 2018ला आवश्यक ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी आणि पॅसेंजर जेट्टी उभारण्याचा हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाला पाठवविण्यात आलेला होता. त्याला मंजुरीसुद्धा पर्यावरण विभागाकडून देण्यात आली होती. त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे या प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला. तसेच कोरोनामुळेसुद्धा या प्रकल्पाचे काम लांबणीवर गेले होते. मात्र आता काशिद बंदरावर ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो रो जेट्टी आणि पॅसेंजर जेट्टी उभारण्याचे काम सुरू झाले असून यावर्षाच्या अखेरीस काम पूर्ण होणार आहे.