मुंबई - महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला मिळणारा दुजाभाव, यासोबतच काँग्रेस मंत्र्यांना मिळणारा कमी निधी आणि सचिन वाझे तसेच परमबीर सिंग या प्रकरणामुळे महाविकास आघाडीची झालेली नाचक्की. तसेच खासदार संजय राऊत हे यूपीएच्या अध्यक्षपदावरून करत असलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसची असलेली नाराजी. या सर्व मुद्द्यावर आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
या शिष्टमंडळात महाराष्ट्राचे कॉंग्रेस प्रभारी एच. के. पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसला महाविकासआघाडीमध्ये दुजाभाव मिळत असल्याची खंत काँग्रेस मंत्र्यांमध्ये होती. याची तक्रार वेळोवेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच प्रभारी एच.के. पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. यासंबंधीची माहिती दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांना देखील देण्यात आली. याच विषयावर आज काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला दिला जाणारा दुजाभावाबद्दल तक्रार केली. येणाऱ्या काळात हा दुजाभाव राहणार नाही, याची खबरदारी घेण्याची विनंतीही यावेळी करण्यात आली. तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना तिन्ही पक्षांनी येऊन कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला होता. त्या कार्यक्रमाचा आढाव घेण्यात यावा अशी विनंती ही यावेळी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
संजय राऊत यांच्या बद्दल ची नाराजी केली व्यक्त -
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यांच्याकडे यूपीएचे अध्यक्षपद देण्यात यावे. जेणेकरून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सक्षम नेतृत्व देशाला लाभेल. अशा प्रकारचे वक्तव्य संजय राऊत यांनी वेळोवेळी केलं आहे. या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये चांगलीच नाराजी पसरली होती. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांनी केलेल्या चर्चेत संजय राऊत यांची देखील तक्रार काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच शिवसेना ही युपीएमधील सदस्य असल्याने संजय राऊत यांना याबाबत वक्तव्य करण्यात अधिकार नाही असे खडे बोल प्रभारी एच.के. पाटील यांनी सुनावले आहेत.
किमान समान कार्यक्रमाचा आढावा -
महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांनी किमान समान कार्यक्रम आखला. या कार्यक्रमानुसार राज्य सरकार कारभार करेल असं तिन्ही पक्षांनी ठरवलं. मात्र आता किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यात यावा, अशा प्रकारची मागणी देखील काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे. तसेच येणाऱ्या काळात होणाऱ्या महामंडळावरच्या वाटपा संदर्भात देखील काँग्रेसने आपली बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडली असल्याचं माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले