मुंबई - मालमत्ता कर वाढीबाबत महापालिका प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावाला काँग्रेसने कडाडून विराेध केला. त्यामुळेच, स्थायी समितीत हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला. काँग्रेसने हा मुद्दा लावून धरला होता. यामुळेच मालमत्ता करवाढ टळली, असा दावा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. मालमत्ता करवाढीचा हा प्रस्ताव जून 2025 पर्यंत स्थगित ठेवण्यात यावा, अशी मागणी एका पत्रकार परिषदेत भाई जगताप यांनी केली.
हेही वाचा - केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात पावसाळी अधिवेशनात ठराव करावा - राजू शेट्टी
मालमत्ता करवाढ रद्द करण्यात काँग्रेसचा पुढाकार
मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मागील वर्षी सादर करण्यात आला होता. मात्र, कोरोनाच्या प्रसारामुळे हा प्रस्ताव एका वर्षेसाठी पुढे ढकलण्यात आला होता. आता पुन्हा हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला असता काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी विरोध केला होता. याबाबत आपण मुख्यमंत्री आणि महापौरांना पत्र दिले होते. त्यानंतर हा प्रस्ताव मंजुरीसाठी आला असता पुन्हा रवी राजा यांनी आवाज उचलून हा प्रस्ताव रद्द करायला लावला. मालमत्ता कराचा निर्णय स्थगित ठेवल्याबद्दल भाई जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानले. पालिकेत विराेधी पक्षनेते रवी राजा यांनी मालमत्ता करवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी सतत आवाज उठविल्याने ही करवाढ रद्द झाल्याचा दावा त्यांनी केला.
सर्वपक्षीयांनी करवाढ फेटाळली -
मुंबईत प्रत्येक पाच वर्षांनी मालमत्ता करात वाढ केली जाते. सन २०१५ मध्ये मालमत्ता कर वाढवण्यात आला होता. त्यानंतर २०२० मध्ये ही वाढ केली जाणार, असे संकेत होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे करवाढीचा निर्णय लांबणीवर पडला. प्रशासनाने यंदा पुढील चार वर्षांसाठी २०२५ पर्यंत पालिकेने मालमत्ता करवाढीचा निर्णय घेतला होता. मात्र स्थायी समिती बैठकीत तसा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी आणला होता. काँग्रेस आणि भाजपाने या करवाढीला विरोध केला होता. विरोधी पक्षाने विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला होता. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी उपसूचना मांडून प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली. त्याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्याने प्रस्ताव एकमताने फेटाळण्यात आला. मात्र, आता मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका जवळ येवू लागल्याने श्रेयाची लढाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनाही या निर्णययाचे श्रेय घेत आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधाऱ्यांसह विराेधी पक्षांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली आहे.
"देवेंद्र फडणवीस नसून ते फसवणीस आहेत"
भाई जगताप यांनी ओबीसी आरक्षणाबाबत देखील एका पत्रकार परिषदेत भाष्य केले. येथे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. देवेंद्र फडणवीस हे आरक्षणविरोधी होते. त्यांच्यासारखा डुप्लिकेट माणूस बघितला नाही. देवेंद्र फडणवीस नसून ते फसवणीस आहेत, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला. ओबीसी आरक्षणाबाबत फायलींवर सही करताना फडणवीस यांचा हात का थांबला नाही? असा प्रश्न देखील जगताप यांनी उपस्थित केला. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत फडणवीस यांनी भाजपच्या ८२ जागा वाचवून दाखवाव्यात, असे आव्हानही जगताप यांनी दिले.
हेही वाचा - 'सचिन वाझे व हिरेन हत्या प्रकरणात माझा संबंध नाही'