मुंबई - भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांसाठी सदस्य नोंदणी कार्यक्रम सुरू केला आहे. पक्षाचे राष्ट्रीय सदस्य नोंदणी अभियान प्रमुख आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी आज पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. त्यांनी आगामी निवडणुकीसाठी भाजप कशा प्रकारे काम करत आहेत याबद्दल सांगितले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या काँग्रेस आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली.
'या लोकसभा निवडणुकीत जातीयतावादाची हार झाली. विकासाचा विजय झाला. अजून सर्वोच्च विजय होणे बाकी आहे. त्यामुळे सर्व राज्यात सरकार येईपर्यंत चांगले काम करत रहा, असे पक्षश्रेष्ठी, नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी सर्वांना सांगितले आहे. आता येणाऱ्या निवडणुकीत मतदानाच्या टक्का वाढवायचा आहे. ज्या राज्यांत भाजप सरकार नाही त्याही राज्यांत ते सरकार स्थापन करायचे आहे, हे सध्या पक्षाचे लक्ष्य आहे,' असे चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले.
काँग्रेस आणि काँग्रेस अध्यक्षांबद्दल विचारले असता, 'काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहेत आणि पुढे कोण होतील, याचा काही पत्ता नाही. हरले ते राहुल गांधी 'रणछोडदास' आहेत. जीतने वाले दौड रहे हैं और हारने वाले 'रण छोड' रहे हैं,' असे म्हणत चौहान यांनी काँग्रेसला टोला लगावला.
'कोणत्याही राज्यात आता चिंता नाही. भाजपचाच विजय होईल. आम्ही संघटन निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप महायुती या निवडणुकीतही कायम राहील,' असे ते म्हणाले.
'आम्ही सर्वांत मोठा पक्ष आहोत. पण आम्हाला अजून खूप मोठे व्हायचे आहे. सर्वस्पर्शी भाजप आणि सर्वव्यापी भाजप हे आमच्या या संघटन निर्माणाचे ब्रीद वाक्य आहे. सहा जुलैला प्रधानमंत्री सदस्यता नोंदणी चे प्रारंभ करणार आहेत. समाजातील प्रत्येक स्तरावर विविध जातीतील लोक सदस्यता नोंदणीवर काम करतील. ६ जुलै ते ११ जुलैदरम्यान सदस्य नोंदणी अभियान सुरू राहील,' असे चौहान यांनी सांगितले.