मुंबई - MPSCची पूर्व परीक्षा रद्द केल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 मार्चला होणारी ही परीक्षा कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे घेता येणार नसल्याचे सांगितल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांसोबत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्यामध्ये आंदोलन सुरू केले. परीक्षा या 14 मार्चलाच घेण्यात याव्यात, अशा प्रकारचा आग्रह त्यांनी धरला आहे. तर तिथेच भाजपा पुरस्कृत आमदार विनायक मेटे हे परीक्षा होऊ नयेत, असे बोलत आहेत. त्यामुळे भाजपाला नक्की काय हवे आहे, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. तसेच एकाच मुद्द्यावर पक्षातील नेत्यांच्या दोन भूमिका असल्याने भाजपा दांभिक पक्ष आहे, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.
हेही वाचा - 'नेत्यांच्या सभा, अधिवेशन पार पडते मग एमपीएससी परीक्षा घेण्यास काय अडचण?'
'दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न'
ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी भाजपाला हा टोला लगावला आहे. तसेच भाजपाला मराठा विरुद्ध इतर समाज असा वाद राज्यांमध्ये निर्माण करायचा आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या भूमिका भाजपाचे नेते घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा - एमपीएससी परीक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला - पंकजा मुंडे
या कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलली
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत कोरोनाविषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून जिल्ह्यानुसार लॉकडाऊन आणि प्रवासावर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च २०२१ रोजीच्या पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे.