मुंबई - काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भेट घेऊन त्यांनी विधान परिषेदेच्या रणनितीवर चर्चा केली. त्यानंतर जगताप यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशीच होणार असल्याचे मत व्यक्त केले.
भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी - ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे. आपण काँग्रेसचे दुसरे उमेदवार असलो, तरी ही निवडणूक केवळ आपल्यासाठी नसून महाविकास आघाडी विरोधात भारतीय जनता पक्ष अशी होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे सांघिकरित्या नेतृत्व करत आहेत. तसेच या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सहा उमेदवार निवडून येतील, असा विश्वास या भेटीनंतर भाई जगताप यांनी व्यक्त केला.
शरद पवार अपक्ष आमदारांची बैठक - आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या सर्व अपक्ष आमदारांची बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यसभा निवडणुकीमध्ये झालेली मतविभागणी विधानपरिषदेच्या निवडणुकीत होऊ नये, याबाबत शरद पवार ही बैठक घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीला लागणार मतांची गरज - विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने उभे केलेले आपले दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठीची मते शिवसेनेकडे आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापही तीन मतांची गरज भासणार आहे. त्यातच काँग्रेसला जवळपास दहा मतांची गरज लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षाच्या आमदारांच्या नियोजनाबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.