मुंबई - विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांची आज त्यांच्या दादरमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी तिघांमध्ये दोन तास चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला रोखायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडीने महाआघाडीत यावे अशी विनंती वडेट्टीवार आणि ठाकरे यांनी आंबेडकर यांना केली. यावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसने वंचितवर केलेल्या 'भाजपची बी टीम' या आरोपाचं स्पष्टीकरण मागितले.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. भाजप-शिवसेनेला टक्कर देण्यासाठी काँग्रेस सर्व विरोधी पक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचितने लाखो मतं घेतल्याने काँग्रेसचे १० उमेदवार पडले होते. यासाठी 'वंचित'ला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्न करत आहेत. मात्र प्रकाश आंबेडकर हे वंचितही भाजपची 'बी टीम'असल्याबाबत काँग्रेसने केलेल्या आरोपांच्या स्पष्टीकरणावर अडून बसले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची गोची झाली आहे. आंबेडकरांनी वडेट्टीवारांना आठवड्याभरात स्पष्टीकरण देण्यास सांगितले असून, त्यानंतर बैठक घेण्याचे मान्य केले आहे.
सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती गंभीर आहे. हे सरकारी यंत्रणांचं अपयश आहे. आजही लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात सरकारला अपयश आलं आहे. सरकारने आतातरी परिस्थिती गांभीर्याने घेऊन, लोकांना मदत करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत असंही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी स्पष्ट केले.