मुंबई - केंद्र सरकारकडून संसदेत आणण्यात आलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात मुंबईत काँग्रेसकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानाजवळील राजीव गांधी भवन येथे ही निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा - 'भाजपला मी, मुस्लीम किंवा कोणताही नागरिक घाबरत नाही; आम्ही फक्त संविधानाला घाबरतो'
यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. केंद्र सरकारच्या या विधेयकाच्या विरोधात जोरदार निदर्शने करून विरोध दर्शवण्यात आला. यावेळी काँग्रेसचे आमदार, पदाधिकारी सहभागी झाले होते.
केंद्र सरकारकडून आणण्यात आलेले राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशात विविध समाजात दुही माजवणारे असून विशिष्ट समाजाच्या ते विरोधात आणि अन्यायकारक ठरणारे आहे. त्यामुळे हे विधेयक लागू केले जाऊ नये, अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात मुंबईसह राज्यभरातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, राष्ट्रीय नागरिकत्व सुधारणा विध्येकाच्या माध्यमातून भाजप राजकारण करत आहे. ते देशात धर्म आणि जाती जातीत भेद निर्माण करत आहे. हा कायदा त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत मांडला आहे. भाजपच्या या विधेयकामुळे समाजात दूही निर्माण होणार आहे. भारतीय संविधानाच्या मुलभूत तत्वात धर्मनिरपेक्षता आहे, त्या तत्वानुसार देश चालला पाहिजे, मात्र भाजप आपले राजकारण करण्यासाठी हा सर्व उद्योग करत आहे, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे जमलो होतो, अशी माहिती थोरात यांनी दिली. तसेच राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेनेकडून आम्हाला अपेक्षा आहे, त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या तत्वानुसार आपली भूमिका ठेवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.