मुंबई - कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिक लसीकरणाला गर्दी करत आहेत. लसीकरणादरम्यान अनेकवेळा कोविन अॅपमुळे गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. कोविन अॅपमुळे आणखी एक गोंधळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात लसीकरणाचा दुसरा डोस घेण्याआधीच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून हा प्रकार कोविन अॅपमधील गोंधळामुळे झाल्याचे समोर आले आहे.
लसीकरणाआधीच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर येथील विठ्ठल नाईक आणि त्यांच्या पत्नी सरवस्ती नाईक हे दोघेही ज्येष्ठ नागरिक आहेत. कोरोना काळात त्यांना घराबाहेर जाता येत नव्हते. आपल्याला कोरोना होईल ही भीती त्यांच्या मनात होती. त्यासाठी त्यांनी लसीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला. १२ मार्चला त्यांनी मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला. त्यांना २८ दिवसानंतर दुसरा डोस घेण्यास यावे लागेल असे सांगण्यात आले. केंद्र सरकारने दोन डोसच्यामधील कालावधी ४५ दिवसांचा करण्यात आला. यामुळे नाईक कुटुंबीय ४५ दिवसांनी राजावाडीत दुसरा डोस घेण्यास आले असता त्यांना दुसरा डोस घेण्यात आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. लसीचा दुसरा डोस घेण्याआधीच लस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याने नाईक कुटुंबीयांमध्ये आता आपल्याला दुसरा डोस दिला जाणार नसल्याची भीती निर्माण झाली. त्यांनी याबाबत कोविन अॅपवरून तक्रार दिली आहे. याबाबत त्यांनी पालिकेच्या घाटकोपर येथील विभाग कार्यालयातही तक्रार केल्याची माहिती आहे.
कोविन अॅपमधून असा प्रकार झाला असावा
दरम्यान याबाबत राजावाडी रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. विद्या ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता, नाईक कुटुंबीयांना दुसरा डोस देण्याआधीच लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार आम्हाला आताच निदर्शनास आला आहे. त्यांनी राजावाडी रुग्णालयाकडे अद्याप कोणतीही तक्रार केलेली नाही. कोविन अॅपमधून त्यांना असे प्रमाणपत्र देण्यात आले असावे, याची पूर्ण माहिती घेऊन नाईक कुटुंबीयांशी संपर्क साधला जाईल. कोणालाही लसीकरणापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली.