मुंबई : मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपालांना भेटणार आहेत. या भेटीत ते राज्यपालांसोबत मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यपालांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासोबत चर्चा करावी अशी विनंती मुख्यमंत्री राज्यपालांना करणार असल्याचे समजते आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार असल्याचे समजते आहे.
उपसमितीचे सदस्यही असणार सोबत
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आज सायंकाळी पाच वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर, यासंदर्भात राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी लक्ष घालावे आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली. त्यामुळे राज्यपालांनी देखील राष्ट्रपती यांच्याकडे मराठा आरक्षण मुद्यावर गांभीर्याने विचार करून त्या समाजाला न्याय देण्याकरता लक्ष घालावे अशी विनंती राज्यपालांकडून करावी यासाठी ही भेट आज होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य देखील असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतरही हे आरक्षण देण्यासाठीचे अधिकार राष्ट्रपती तसेच पंतप्रधान यांच्याकडे असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना मराठा आरक्षणासंदर्भात विनंती केली आहे. यासोबतच राज्यपालांनीही राष्ट्रपतींकडे यासंबंधी चर्चा करावी म्हणून आज सायंकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उपसमितीचे सदस्य राज्यपालांची भेट घेणार आहेत.
वर्षभरानंतर राज्यपालांना भेटणार
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. वेळोवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेणे किंवा राजभवनात जाणे टाळल्याचे दिसले. मात्र आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना जवळपास एक वर्षाच्या कालावधीनंतर राज्यपालांची भेट घेणार आहेत.