मुंबई - नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होता, म्हणून आम्ही विरोधात होतो. मात्र रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नसेल तर महाराष्ट्रात कुठे ही प्रकल्प होईल, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. आरे कारशेडचे कामही यावेळी वाया जाऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरे कारशेड आणि नाणार प्रकरणी शिवसेनेने आज मावळ भूमिका घेतल्याचे दिसून आले.
महाराष्ट्राच्या हिताचं मला कळते आणि हित म्हणजे फक्त पैसा नाही, पर्यावरणही महत्त्वाचे आहे. नाणार रिफायनरीला स्थानिकांचा ठाम विरोध होता. आम्ही आमच्या जनतेला बांधील आहोत. त्याच्यामुळे तिथल्या जनतेचा त्या प्रकल्पाला विरोध आहे. परंतु जेव्हा आम्ही विरोध करत होतो, तेव्हा तिथल्या जनतेच्या मताशी सहमत होऊनच विरोध करत होतो. नाणार व्यतिरिक्त ठरवलेल्या जागेचा स्थानिक लोक स्वागत करत असतील तर आमचा त्याला विरोध नाही. पण ही रिफायनरी नाणारला होणार नाही हा निर्णय झालेला आहे. त्यांना आणि स्थानिक जनतेला मंजूर असेल तर पर्यायी जागी प्रकल्प होईल. त्यामुळेच त्या प्रकल्पाला आता नाणार म्हणू नका रिफायनरी म्हणा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा - सचिन वाझे यांची अखेर क्राईम ब्रँचमधून बदली; विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ
आरे मेट्रोचे काम वाया जाऊ देणार नाही -
मुंबई महानगर प्रदेशाला कांजूरमार्गमधील कारशेड भविष्यात फायदेशीर ठरणारा आहे. त्यामुळे सर्वांगीण दृष्ट्या तो महत्वाचा आहे. सध्या या जागेचा वाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र आम्हाला न्याय मिळेल, असा आशावाद मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच आरे कारशेडचे झालेले काम वाया जाऊ देणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.