मुंबई - राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येत्या रविवारी बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला दिल्लीला जाणार आहेत. राज्यात शिवसेना भाजप युतीच्या चर्चांना आलेला ऊत, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये रंगलेल्या लेटरवॉरमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री शाहांच्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
हेही वाचा - कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांनी लसीकरणाचा वेग वाढवा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
- येत्या रविवारी होणार दिल्लीत बैठक -
नक्षलवादी कारवाया, नक्षलग्रस्त भागांचा विकास, शहरी नक्षलवाद या मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शाह यांनी ही बैठक बोलावली आहे. नक्षल प्रभावित राज्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या बैठकीला हजेरी लावणार आहेत. येत्या रविवारी म्हणजे २६ सप्टेंबर रोजी नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यासह त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाली. राज्यात यानंतर शिवसेना आणि भाजपच्या युतीची चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार असल्याने उलटसुलट चर्चां रंगल्या आहेत.
- राज्यपाल-मुख्यमंत्री वाद -
महिलांवरील अत्याचार प्रकरणावर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा खरमरीत पत्र लिहून राज्यपालांची कानउघडणी केली. तसेच भाजपशासीत प्रदेशात होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराची आठवण करून देत चार दिवसांचे संसदीय अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर चौफेर टीका केली होती.
हेही वाचा - अनोखा लग्नसोहळा, आजी-आजोबा बोहल्यावर; पाहा VIDEO