मुंबई - सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जातीअंताचा लढा यांसह कृषी- सिंचन, औद्योगिक क्षेत्रांतील विकासात्मक दृष्टी यातून समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहूंचे विचार आजही दिशादर्शक आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राजर्षी शाहू महाराजांनी लोकाभिमुख आणि समतामुलक कार्याचा आदर्श घालून दिला. शिक्षणातून समाजाला शहाणे करण्यासाठी आणि सामाजिक समता - सुधारणांबाबत त्यांनी क्रांतीकारक अशी पावले उचलली. समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे राजर्षी शाहूंचे विचार आजच्या काळातही दिशादर्शक आणि क्रांतीकारक आहेत. त्यांच्या या कार्याला प्रणाम करत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यस्मृतींना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली आदरांजली
शैक्षणिकदृष्ट्या बहुजनांच्या उद्धारासाठी सतत झटणारे कृतिशील राजे, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारे प्रयोगशील राजे, अनिष्ट रूढी-परंपरांना प्रखरतेनं विरोध करणारे थोर विचारवंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू महाराजांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.