मुंबई - विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पहिल्या दिवसाच्या शोकप्रस्तावमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी प्रणव दांच्या आठवणींना उजाळा देत भाजपला चिमटे काढले. शोकप्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रणवदांचे कुणाशी वैर नव्हते. भाषणबाजीपेक्षा त्यांनी नेहमीच कामाला महत्व दिले. प्रणवदा यांनी अनेकदा त्याकाळी सरकारला वाचवलं, पक्षाला वाचवल्याचे मुख्यमंत्री ठाकरे विधानसभेत म्हणाले.
दरम्यान, जेव्हा राष्ट्रपतीपदाची निवडणूक होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणवदांना उघड पाठिंबा दिला. त्यावेळी प्रणवदा शरद पवार यांच्याबरोबर मातोश्रीवर आले होते. आमची तेव्हा पहिली भेट होती. समोरच्यांचा आब राखून बोलणे, ऐकून घेणे अशा गोष्टी त्यांच्या स्वभावात पाहायला मिळाल्या. राष्ट्रपती झाल्यानंतर एकदा ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडून बोलावणे आले. भेटल्यावर त्यांनी महापालिका निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन केलं. ते म्हणाले, मला वाटलं नव्हतं मी राष्ट्रपती होईन, शिवसेनाप्रमुख यांच्यामुळे मी राष्ट्रपती झालो. हे ऋण व्यक्त करण्यासाठी मी तुला भेटत आहे, असे त्यांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाहीतर काहीजण 'रात गयी बात गयी' खुर्ची मिळाली की विचार करत नाहीत, अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर शिवाजीराव पाटील निलंगेकर, अनिल राठोड, सुधाकर परिचारक, हरिभाऊ जावळे, सदाशिवराव ठाकरे, रामकृष्ण पाटील, शितल दास हरचंद आणि सुनील शिंदे, शामराव पाटील, अण्णासाहेब उढाण, सुरेश पाटील, रतन बापू राऊत, मधुकर कांबळे आणि श्रीमती चंद्रकांत गोयल यांच्या दुःखद निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडला.
त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहिली. शोक प्रस्तावावार शिवसेनेचे एकनाथ शिंदे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अशोक चव्हाण आणि हरिभाऊ बागडे, राजेश टोपे यांचीही भाषणे झाली.