मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. मात्र, तरीही काही शेतकऱ्यांना भेटता न आल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.
नांदुसा गावच्या सरपंचांना फोन - नांदेडमधील नांदुसा गावाचे सरपंच भास्कर जानकवडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. या गावातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले आहे. नांदेड, हिंगोली भेटीदरम्यान या शेतकऱ्याची भेट घेण्याचे राहिल्यामुळे त्यांनी खास व्हिडिओ कॉल करून या शेतकऱ्याची चौकशी केली. हे सरकार सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी जनतेचे सरकार असून, येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना नक्की दिलासा देऊ. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. सर्वांना योग्य मदत दिली जाईल, असे शिंदे यांनी या शेतकऱ्याना आवर्जून सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तार झाला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा आज पार पडला असून, या विस्तारामध्ये एकूण 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. राज भवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर सरकारमधील आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. तसेच नाराजी असल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी सक्षम असल्याचे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तसेच, आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही प्रमुख नेते चर्चा करून खातेवाटपाबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती अतुल सावे यांनी दिली.
मंत्रिमंडळात शिंदे गटाचे 9 आणि भाजपचे 9 आमदार - राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास 38 दिवस उलटून गेल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे. शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांपैकी नऊ आणि भाजपचे नऊ अशा एकूण १८ आमदारांचा मंत्रिपदाचा शपथविधी झाला आहे. यासंबंधी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांची जवळपास दोन तास बैठक पार पडली.