मुंबई - ठाणे शहरात नागरिकांची लोकसंख्या वाढल्याने अपुरा पिण्याच्या पाण्याचा होतो. ही बाब लक्षात घेत, ठाणे शहरातील नागरिकांना एक ऑगस्टपासून अतिरिक्त पन्नास एमएलडी पाणी ( Fifty MLD Water Thane ) देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde ) यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना यामुळे धो धो पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नावर आढावा घेण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत त्यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाला ठाणे शहराला अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे निर्देश दिले होते. राज्याच्या जलसंपदा विभागाने अतिरिक्त 50 एमएलडी पाणी देण्याला मंजुरी दिली आहे.
ठाणे शहराला दररोज 485 दशलक्ष मिलिलिटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे तो देखील अपुरा पडू लागला होता. मध्य वैतरणा जलाशयाची उंची वाढवण्यात आल्याने जास्त पाणी अडवणे शक्य होत असल्याने आता ठाणे शहराला 100 एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ठाणे महानगरपालिकेने मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पाणी तातडीने देण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले होते.
त्यानुसार ठाणे शहराची तातडीची गरज भागवण्यासाठी जलसंपदा विभागाने 50 एमएलडी पाणी येत्या 1 ऑगस्ट पासून ठाणे शहराला देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. ठाणे शहराला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वेगाने विस्तार झाल्यामुळे विस्तारित ठाणे शहराला पाणी पुरवठा करताना ठाणे महानगरपालिकेला मोठी कसरत करावी लागत होती. पण, आता हे पाणी मिळाल्यामुळे त्यांना दिलासा देणे पालिकेला देखील शक्य होणार आहे.
हेही वाचा - Deepak Kesarkar : 'मातोश्री, शिवसेना भवनावर दावा केला नाही, परंतु...'; दीपक केसरकरांनी स्पष्टचं सांगितलं