मुंबई - विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या व्यासपीठावरून दलित समाजासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचत समाजाला खुश करण्याचा प्रयत्न केला. इंदू मिलच्या जागेचा प्रश्न आम्हीच सोडवला आहे. येणाऱ्या 6 डिसेंबर 2020 पर्यत आम्ही येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारू. मात्र, हे बोलत असताना अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेखही केला नाही.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेशचा भव्य मेळावा सरदार वल्लभाई पटेल स्टेडियम एनएससीआय क्लब येथे घेण्यात आला, यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पाच वर्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरून राज्य चालवण्याचा प्रयत्न केला. अनेक महत्वाचे निर्णय या वर्षात घेतले. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदूमिलची जागा देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या सरकारने एक इंच जागा दिली नाही. फक्त वेगवेगळी कारणे दिली. मोदीजींनी तीन दिवसात हा निर्णय घेतला. 2020च्या महापरिनिर्वाण दिनी स्मारकाच दर्शन लोकांना घेता येईल एवढ्या वेगात स्मारकाच काम सुरू आहे.
बुद्धिस्ट थीम पार्क आम्ही सुरू करणार आहोत. त्याचे देखील काम सुरू आहे. शिक्षणाच्या संदर्भात स्वयंम सारखी योजना सुरू केली आहे. महायुतीचेचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. यावेळी विधानसभेत रिपाइं चे आमदार निवडून येतील. भाजप सरकार संविधान बदलणार अशी रेकॉर्ड वाजवली जाते, ते रेकॉर्ड जून झालं आहे. हा अपप्रचार जाणीवपूर्वक केला जातो. अनुसूचित जातीधर्माच आरक्षण कोणीही नष्ट करू शकत नाही, अस ते म्हणाले.