मुंबई : मालाड येथील कुरार पोलिसांनी एका गांजा तस्कराला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा तरुण सिव्हिल इंजिनिअर आहे. भाजी विकण्याच्या आडून तो गांजाची विक्री करत होता. होळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गांजा विकण्याची त्याची योजना होती.
६३ किलो गांजा जप्त..
या तरुणाकडून पोलिसांनी तब्बल ६३ किलो गांजा जप्त केला आहे. भाज्यांच्या गोडाऊनमध्ये तीन गोण्यांमध्ये हा गांजा लपवून ठेवण्यात आला होता. याची एकूण किंमत सुमारे ९ लाख ४५ हजार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लॉकडाऊनमध्ये गेली नोकरी..
सचिन साळुंखे (२८) असे या आरोपीचे नाव असून, तो सिव्हिल इंजिनिअर होता. लॉकडाऊन काळात नोकरी गेल्यामुळे त्याने भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. यासोबतच त्याचा संपर्क काही गांजा तस्करांशी आल्यानंर, ओडिशामधून त्याने ६३ किलो गांजा मागवला होता. होळीच्या निमित्ताने हा गांजा विकण्याची त्याची योजना होती. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे त्याची ही योजना फसली.
कुरार पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांनी दिली.
हेही वाचा : लज्जास्पद ! मुलाने वृद्ध आईच्या कानफाटात मारली, जमिनीवर पडताच मृत्यू