मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने कार्यालयातील गर्दी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका मुख्यालय आणि इतर कार्यालयात नागरिकांना प्रवेश बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिले आहेत.
राज्यात निर्बंध
मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार कमी होत असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कालच नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी तर रात्री 8 ते सकाळी 7 असा नाईट कर्फ्यु लावण्यात आला आहे. रात्री 8 नंतर खासगी वाहनांनी प्रवास न करता सार्वजनिक वाहतुकीच्या साधनाने म्हणजेच ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी यांनी ठरवून दिलेल्या क्षमतेने प्रवास करण्याचे आदेश दिले आहेत. मंदिरे, पब, बार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आले आहे. सरकारी कार्यालयातही 50 टक्के उपस्थिती ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या कार्यालयात नागरिकांना प्रवेश नाही
वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालयात होणारी गर्दी आटोक्यात आणण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार मुंबई महापालिकेने आपल्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना प्रवेश बंदी केला आहे. त्यासाठी पालिका आयुक्तांनी एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार लोकप्रतिनिधी वगळून तातडीची कामे, बैठकाना वगळून इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयात बंदी करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीत 48 तासामधील कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणाऱ्याना नागरिकांना पास द्यावा असे पत्रकात म्हटले आहे. कार्यालयाबाहेरील कर्मचारी अधिकारी वगळून इतर अधिकारी कर्मचाऱ्यांशी ऑनलाईन बैठका घ्याव्यात, महापालिका मुख्यालय आणि इतर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर टपाल स्वीकारावे, पालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केंद्र सरकारच्या नियमानुसार लसीकरण करून घ्यावे असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.
हेही वाचा - 'पत्रकारही फ्रंटलाईन वॉरियर्स, त्यांनाही प्राधान्याने लस द्या'