मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. २३६ प्रभागांसाठी प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यावर ८९३ हरकती दाखल करण्यात आल्या असून त्यापैकी ५५५ हरकतींवर दोन दिवसात सुनावणी पूर्ण झाली आहे. तर ३३८ हरकती दाखल करणाऱ्यांनी सुनावणीकडे पाठ फिरवली आहे. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली याबाबतचा अहवाल २ मार्चला निवडणूक आयोगाला सादर केला जाणार असल्याचे पालिकेतील निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रभाग पुनर्रचना -
मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीपूर्वी प्रभाग पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे भाजपाला फायदा झाला असा आरोप केला जात होता. पालिकेचा कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक होणार आहे. त्यासाठी लोकसंख्या वाढल्याचे कारण देत राज्य सरकारने पालिकेच्या प्रभाग संख्येत ९ ने वाढ करून ही संख्या २३६ इतकी केली आहे. प्रभाग वाढल्याने सर्वच प्रभागांच्या सीमारेषा बदलल्या आहेत.
३३८ जणांची सुनावणीकडे पाठ -
प्रभागांच्या सीमारेषा बदलल्याने त्यावर सूचना व हरकती मागवण्यात आल्या. पालिकेकडे ८९३ हरकती दाखल झाल्या आहेत. त्यावर २२ व २३ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, कोंकण विभाग आयुक्त, मुंबई शहर व उपनगर विभागाचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्या समितीपुढे सुनावणी झाली. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सूनवण्या घेण्यात आल्या. त्यापैकी ५५५ हरकतींवर दोन दिवसात सुनावणी पूर्ण झाली आहे. तर ३३८ हरकती दाखल करणाऱ्यांनी सुनावणीकडे पाठ फिरवली आहे. २ मार्चपर्यंत त्याचा अहवाल ही समिती निवडणूक आयोगाला सादर करेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हरकती वाढल्या -
मुंबई महापालिकेची २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. त्यासाठी २०१६ मध्ये तत्कालीन भाजप, शिवसेनेच्या सरकारने प्रभाग पुनर्र्चना केली होती. त्यावेळी पुनर्र्चनेविरोधात ६१३ हरकती सूचना प्राप्त झाल्या होत्या. २०२२ मध्ये पालिकेची निवडणूक होत आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने नव्याने प्रभाग पुनर्र्चना केली आहे. त्यासाठी ८९३ हरकती आल्या आहेत. मागील वेळेपेक्षा यंदा हरकतींची संख्या वाढली आहे.