मुंबई - धारावीत शाहू नगर येथे रविवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. या घटनेत १७ जण जखमी झाले होते. त्यापैकी सोनू जयस्वाल (८) या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. तर प्रमोद यादव (३७) आणि मेहरूनिसा खान (४०) या दोघांनी डिस्चार्ज मिळाला आहे. तर गंभीर लोकांची संख्या ९ वर गेली असून त्यापैकी तिघेजण व्हेंटिलेटरवर आहेत.
गॅस सिलेंडर स्फोटात 17 जण जखमी -
रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास धारावी, शाहू नगर, कमलानगर येथील मुबारक हॉटेलसमोरील भागातील एका चाळीत एका घरात गॅस गळती होत आहे म्हणून घरातील व्यक्तीने घाबरून गॅस सिलेंडर घराबाहेरील उघड्या जागेत आणून ठेवला होता. काही वेळात या सिलेंडरचा स्फोट होऊन त्यात १७ जण जखमी झाले. या जखमींना अग्निशमन दल, पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांनी तसेच स्थानिक रहिवाशांनी सायन रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी ५ जण गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गॅस सिलेंडर स्फोटाला जबाबदार असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
'त्या' चिमुकल्याचा मृत्यू -
या घटनेत जखमी झालेल्यांपैकी सोनू जयस्वाल (८ वर्ष) या लहान मुलाचा मृत्यू आज (मंगळवार) झाला. तर प्रमोद यादव (३७) आणि मेहरूनिसा खान (४०) या दोघांना डिस्चार्ज मिळला आहे. शौकत अली (५८ वर्ष), अंजु गौतम (२८) आणि सांतरादेवी जयस्वाल (४०) हे तिघेजण गंभीर अवस्थेत व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच, प्रेम जयस्वाल (३२), अंजु गौतम (२८), अलिना अन्सारी (५), राजेश जयस्वाल (४५), फिरोज अहमद (३५), अत्ताझम अन्सारी (४), अमिनाबीबी असे एकूण ९ जण गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. तर, उर्वरित ५ जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - मुंबईतील धारावी परिसरात सिलिंडरचा स्फोट, 15 जण जखमी