मुंबई - मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात इसमाने आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी धमकी व्हॉट्सअप वरून दिली असून नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे विश्वासू नार्वेकर -
शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून गेले कित्तेक वर्षं मिलिंद नार्वेकर हे काम बघत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासातील व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या अनेक राजकीय महत्त्वाच्या निर्णयात नार्वेकर यांचा सहभाग राहिला आहे.
पोलिसांकडे तक्रार -
मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअपवरून ईडी, एनआयए आणि सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
हेही वाचा - पॉलिटीशियन थापा मारतात - डॉ. सायरस पूनावाला