मुंबई - तेजाभिमानी राजा म्हणून इतिहासात अजरामर नोंद झालेले महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ भव्य पुतळा माझगाव येथील महाराणा प्रताप चौकात उभारण्यात आला आहे. (equestrian statue of Maharana Pratap) या पुतळ्याचे अनावरण, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे आज (दिनांक २३ जानेवारी २०२२) सायंकाळी सात वाजता होणार आहे.
अश्वारूढ पुतळा -
प्रत्येक भारतीय योद्ध्यासाठी प्रेरणेचा मानबिंदू असणाऱ्या महाराणा प्रताप यांचा दक्षिण मुंबईत पुतळा उभारला गेला आहे. दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरात प्रभाग क्रमांक २०९ मध्ये महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांचा हा भव्य आणि अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनात दिनांक (२३ एप्रिल २०१८)रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराणा प्रताप चौकाचे सुशोभिकरण व महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले.
साडेचार टन वजनी आणि कांस्याने बनविलेला हा पुतळा
हा चौक नेस्बिट मार्ग आणि शिवदास चापसी मार्ग जंक्शनवर स्थित आहे, जे मुळात वाहतूक बेट आहे व इतर पाच वाहतूक बेटाने वेढलेले आहे. चौकाचे सुशोभीकरण आणि महाराणा प्रताप यांचा पुतळा स्थापित करण्याच्या प्रस्तावाला (५ मार्च २०१९)रोजी मंजुरी मिळाली. धुळे येथील शिल्पकार सरमद शरद पाटील यांनी महाराणा प्रताप यांचा हा पुतळा साकारला आहे. (८ ऑगस्ट २०१९) रोजी हा पुतळा मुंबईत आणण्यात आला. २० फूट उंचीच्या चौथ-यावर, १६ फूट उंचीचा हा भव्य पुतळा स्थापित करण्यात आला आहे. साडेचार टन वजनी आणि कांस्याने बनविलेला हा पुतळा भालाधारी व अश्वारूढ आहे.
चौकाचे सुशोभीकरण -
पुतळा उभारताना संपूर्ण चौकाचे नावीन्यपूर्ण पद्धतीने सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे. या ठिकाणी चौकाला शोभेल अशी आकर्षक विद्युत रोशणाई देखील करण्यात आली आहे. वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असताना बेस्ट बसस्थानकाजवळील एका बेटावर जुने कारंजे आढळून आले. त्याचा जीर्णोद्धार करून सुशोभीकरण करण्यात आले आहे.
पुतळा समितीची विहित परवानगी प्राप्त करून हे काम पूर्ण करण्यात आले
महाराणा प्रताप यांच्या जीवनावर आधारित विविध भित्तिशिल्प आजूबाजूच्या त्रिकोणी बेटांवर लावण्यात आले आहेत. तसेच, चौक परिसरातील रस्ते सुधारणा देखील करण्यात आली आहे. महानगरपालिकेचे विविध खाते, ई विभाग कार्यालय, बेस्ट प्राधिकरण आदींच्या समन्वयासह आणि शासनाच्या पुतळा समितीची विहित परवानगी प्राप्त करून हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
हे लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित -
महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, पर्यावरण, पर्यटन तसेच राजशिष्टाचार मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार यामिनी यशवंत जाधव, तसेच आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह, सभागृह नेता विशाखा राऊत, विरोधी पक्षनेता रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक यशवंत जाधव, ई प्रभाग समिती अध्यक्ष रमाकांत रहाटे, स्थानिक नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर, महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती लक्षात घेता, आवश्यक त्या सर्व निर्देशांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडणार आहे.
हेही वाचा - नाशिक : 200 वर्षे जुन्या वृक्षांची कत्तल थांबणार; आदित्य ठाकरेंची आयुक्तांना आराखड्यात बदल करण्याची सूचना