मुंबई - घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवीचे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या.
कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. तसेच राज्यातील नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच मंदिरे दर्शनासाठी बंद होती. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मंदिराचे पुजारी आणि विरोधकांकडून नागरिकांना दर्शनासाठी मंदिरे खुली करण्याची मागणी करत आंदोलने केली. राज्यपाल कोश्यारी यांनीदेखील यामध्ये हस्तक्षेप केला होता. मात्र जनतेच्या आरोग्याला प्राधान्य म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंदिर उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकला होता. दरम्यान, राज्यात लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय जाहीर केला.
कोरोना नियंमांचे पालन करण्याचे आवाहन-
आजपासून राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे खुली करण्यात आली आहेत. दरम्यान सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था करावी. तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे, असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना नियमांच्या पालनांसाठी पुन्हा एकदा आवाहन केले. तचेस सिद्धिविनायकसह इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल त्यांनी कौतूक केले.
अजित पवारांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
घटस्थापनेपासून राज्यभरातील मंदिर भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यानुसार आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. दरम्यान, आज दिवसभर त्यांच्या बहिणी आणि मुलाच्या ऑफिस आणि घरांवर प्राप्तिकर खात्याने धाडी टाकल्या. त्यांच्याशी केवळ रक्ताचे नाते असल्याने धाडी टाकण्यात आल्या, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
राजेश टोपे म्हणाले, दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट
करोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेली राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आजपासून भाविकांसाठी खुली झाली आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. राज्यातील मंदिर खुली होत असल्याने एक आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महालक्ष्मी मातेचे दर्शन घेत घटस्थापनेच्या दिवशी आशीर्वाद घेतला आहे. त्यानंतर टोपे म्हणाले, की सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. पण दसरा आणि दिवाळीनंतर तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक भान ठेवून वर्तवणूक ठेवणे आवश्यक आहे. कळजी घेणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.
साईबाबांच्या काकड आरतीने खुले झाले साई मंदिर; 90 भाविक आरतीत सहभागी
अहमदनगर- शिर्डीच्या साईबाबा मंदिराची कवाडे आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे उघडण्यात आली आहेत. आज साईबाबांच्या पहाटेच्या काकड आरतीला शिर्डीकरांसह देशातील विविध भागातून आलेल्या ९० भक्तांना साईमंदीरात प्रवेश देण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून साईमंदिर बंद असल्याने प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी आसुसलेल्या भक्तांची इच्छा आज पुर्ण झाली. भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. ऑनलाईन पास आणि देणगी दिलेल्या भक्तांना गुरुवारी पहिल्यांदा दर्शनाचा मान मिळाला आहे.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले
पुणे - गेल्या काही काळापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली प्रार्थना स्थळे तसेच धार्मिक स्थळे आजपासून पुन्हा खुली करण्यात आली आहे. गेली एक ते दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे आजपासून सुरू झाल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे 6 वाजता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते उघडण्यात आली.
अंबाबाई मंदिरात झाली घटस्थापना, नवरात्रोत्सवाला सुरुवात
कोल्हापूर - करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास तोफेची सलामी देऊन नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर घटस्थापनेच्या धार्मिक विधीला सुरुवात होऊन अभिषेक आणि अन्य विधी पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पास असेल तरच भक्तांना दर्शन मिळणार आहे. तब्बल 30 हजारहून अधिक भाविकांनी पहिल्याच दिवशी ऑनलाईन नोंदणी केली असून, भक्तांनीही सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे. दरम्यान, दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अंबाबाईची अलंकार पूजा बांधण्यात येणार आहे.