मुंबई : बिहारमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीए आघाडीवर असली तरी, महागठबंधनही जास्त मागे नसल्याचे दिसत आहे. या निकालांवर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रातही शिवसेनेसोबत राहून भाजपाने शिवसेनेलाच पछाडले होते; तेच चित्र बिहारमध्येही दिसत असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.
भाजपाचा चेहरा आज पुन्हा उघड झाला
मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. काही वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादव आणि नीतिश कुमार एकत्र आले होते. अशाप्रकारे राजकीय समीकरणे बदलू शकतात. त्यामुळे आणखी थोड थांबायला हवे, असे सांगून भुजबळ म्हणाले, भाजपाचा चेहरा आज पुन्हा उघड झाला आहे. महाराष्ट्रातही शिवसेनेसोबत राहून भाजपने शिवसेनेलाच पछाडले, तेच चित्र बिहारमध्ये दिसत आहे. नितीश कुमार यांच्या सोबत राहून भाजपने अधिक जागा जिंकल्याचे दिसत आहे. मात्र राजकारणात काहीही घडू शकते.
निवडणूक ठरली रंजक
बिहार विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या ३,७३३ उमेदवारांपैकी कोणाच्या नशीबात 'खुर्ची' आली आहे, हे आज स्पष्ट होईल. तीन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या या निवडणुकीचा आज निकाल लागत आहे. मोदी-राहुल यांच्या सभा, चिराग पासवान यांचे एनडीएतून बाहेर पडणे, तसेच नीतिश कुमारांची ही शेवटची निवडणूक असल्याची भावनिक साद अशा विविध घटनांमुळे ही निवडणूक अत्यंत रंजक ठरली.
पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपाला मोठे यश
बिहारमध्ये भाजपा सध्या ७० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच भाजपा बिहारमध्ये मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे. विशेष म्हणजे, एनडीएमध्ये जदयू मोठा भाऊ, आणि भाजप लहान भाऊ आहे. तरीही, सध्या हाती आलेल्या कलांनुसार भाजप ७०, तर जदयू केवळ ५३ जागांवर पुढे आहे.
हेही वाचा- LIVE : बिहार विधानसभा निवडणूक निकालाचे सर्वात जलद आणि अचूक अपडेट्स!