मुंबई - महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासहित समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निर्णयाचा सन्मान करत छगन भुजबळ यांनी सर्वांचे आभार मानले. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर छगन भुजबळ यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना "सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही" असे म्हणत त्यांनी त्यांच्या कायदेशीर लढाईला आलेल्या यशाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
'न्यायालयाने आरोपातून दोषमुक्त केल्याचे समाधान'
महाराष्ट्र सदनाची इमारत बांधत असताना पैशाचा गैरव्यवहार झाल्याचा खोटा आरोप आपल्यावर विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. मात्र आज (गुरूवार) सत्र न्यायालयाच्या निकालानंतर माझी कोणाबद्दल ही द्वेष बुद्धी नाही, कोणाबद्दल तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या कठीण वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षातील इतर नेते ठामपणे माझ्यामागे उभे राहिले. तसेच माझ्यावर आरोप असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला मंत्रिमंडळात मला सामावून घेऊन माझ्यावर विश्वास दाखवला याबाबत त्यांनी यांचे आभार मानले आहेत. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर या विरोधात काही लोक उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा प्रयत्न नक्की करतील, त्यांनी खुशाल जावे असा टोला सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया आणि भाजपा नेते किरीट सोमैय्या यांना लगावला आहे. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला निकाल हा योग्यच आहे असा विश्वास छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या आरोपांमुळे सव्वा दोन वर्ष आपल्याला तुरुंगात राहावे लागले. मात्र सत्र न्यायालयाने आपल्याला या आरोपातून दोषमुक्त केल्याचे समाधान आहे असे यावेळी छगन भुजबळ म्हणाले.
'महाराष्ट्र सदनाची आजही वाह वाह'
महाराष्ट्र सदनाची इमारत एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे निर्माण करण्यात आली. आजही या वास्तूची वाह वाह होते. गेली आठ वर्ष राज्यातील प्रत्येक नेते आणि कार्यकर्ते या वास्तूचा उपयोग करत आहेत. ही इमारत बांधत असताना कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. ही इमारत बांधून झाल्यावर कंत्राटदाराला शंभर कोटी रुपयांचा एफएसआय दिला जाईल असे सांगण्यात आले होते. अद्यापही त्या कंत्राटदाराला एक फूट देखील जागा मिळालेली नाही. अशी माहिती पत्रकार परिषदेतून छगन भुजबळ यांनी दिली.
'माझ्या विरोधात कट कारस्थान रचले गेले'
महाराष्ट्र सदन बांधत असताना पैशाचा अपहार केल्याप्रकरणी माझ्यावर आरोप झाले. मात्र हे सर्व कट-कारस्थान होते हे आता सिद्ध झाले आहे. विरोधी पक्षाकडून अजूनही आघाडी सरकारच्या काही नेत्यांवर आरोप केले जात आहेत. या आरोपांचा त्रास त्यांना होईल. मात्र अखेर तेही या आरोपातून मुक्त होतील असं यावेळी छगन भुजबळ यांनी आपल्या सहकाऱ्यांना सल्ला दिला आहे.
'ईडीच्या कारवाईतून लवकर मुक्त होणार'
महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी केल्याल्या आरोपातून ईडी (सक्तवसुली संचालनालय) यांच्याकडून कारवाई सुरू होती. मात्र सत्र न्यायालयाने या आरोपातून आपल्याला दोषमुक्त केल्यामुळे लवकरच ईडीच्या ही कारवाईतून आपण मुक्त होऊ असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. तसेच आपल्यावर असलेल्या इतर आरोपातून आपण लवकरच दोषमुक्त होऊ. आता न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे सुरुवात असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ दोषमुक्त, एसीबी न्यायालयाची क्लीनचीट