मुंबई - नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील राजकारण बदलत असून महाविकास आघाडीतही संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. याला कारणही तसेच आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याचे अध्यक्षपद महाआघाडीत ठरल्याप्रमाणे काँग्रेसच्या वाट्याला आले, मात्र आता पुन्हा अध्यक्षपद काँग्रेसलाच मिळेल, अशी स्पष्ट भूमिका अद्याप महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी व्यक्त केलेले नाही. त्यामुळे पुढचे विधानसभा अध्यक्ष कोण? याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
पटोले यांचा राजीनामा, प्रदेशाध्यक्ष तसेच मंत्रीपदाचीही चर्चा जोरात -
काँग्रेसने पक्षांतर्गत बदल करण्याचा निर्णय घेतला असून प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील आक्रमक नेते नाना पटोले याना देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या आदेशानेच मी राजीनामा दिला असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचे पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर स्पष्ट केले. पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा काँग्रेसने केली आहे. त्याचबरोबर पटोले यांना मंत्रिपद देऊन काँग्रेसचा आक्रमक चेहरा सभागृहात आणण्याची तयारी सुरु असल्याचीही जोरदार चर्चा आहे. यावर बोलताना काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी स्पष्ट केले की, पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले आहे. मात्र, त्यांना मंत्री करायचे किंवा नाही यावर पक्षश्रेष्टी योग्य तो निर्णय घेतील. तसेच विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकासआघाडीत चर्चा होईल.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याने पुन्हा आघाडीला या राजकीय राजकीय पेचाला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना या सत्ताधारी घटक पक्षातही काहीशी नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. आघाडीचे मार्गदर्शक व जेष्ठ नेते शरद पवार यांनीही या मुद्यावर भाष्य केले असून विधानसभा अध्यक्ष पदाबाबत सर्व घटक पक्षांशी चर्चा झाल्यानंतरच याबाबतची घोषणा करण्यात येईल, अशी भूमिका मांडली आहे. मात्र काँग्रेसलाच अध्यक्षपद मिळेल असे थेट वक्तव्य पवार यांनी केले नसल्याने आघाडीतही संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे विधानसभा अध्यक्षपदावरून संभ्रम निर्माण झालेला असतानाच विधान परिषदेच्या अध्यक्षपदावरही चर्चा व्हावी, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा असल्याचेही सांगण्यात येत आहे.