मुंबई - गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात लाखो चाकरमानी जातात. कोकणात कोरोना, डेल्टा प्लसचा या विषाणूचा प्रसार असल्याने मुंबईत परतत असताना प्रवाशांची स्क्रिनिंग केली जाणार आहे. या स्क्रिनिंगवेळी ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येतील अशा प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील. तसेच कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्याही पहिल्याच दिवशी आरटीपीसीआर टेस्ट केल्या जातील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
कोरोनाचा प्रसार -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात निर्बंधांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबईसह कोकणात मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी चार ते पाच लाखाहून अधिक मुंबईकर चाकरमानी ट्रेन, एसटी, खासगी वाहनांनी कोकणात जातात. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाचा प्रसार असल्याने उत्सव आणि सण साधेपणाने साजरे करावेत, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. कोकणात कोरोनासह नव्या डेल्टा प्लस व्हेरियंटचाही प्रसार आहे. डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण हे जळगाव, रत्नागिरी तसेच मुंबईत आढळून आले आहेत.
कोकणात आरटीपीसीआर टेस्ट -
कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे, लस घेतली नसल्यास आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावे अन्यथा कोकणात रेल्वे स्टेशन, एसटी डेपो आदी ठिकाणी आरटीपीसीआर टेस्ट केली जात आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी काळजी घेतली जात आहे.
मुंबईत परतताना होणार टेस्ट -
मुंबईहून कोकणात गेलेला चाकरमानी पुढील पाच ते दहा दिवस कोकणातील नागरिकांच्या संपर्कात येणार आहे. त्यानंतर हा चाकरमानी मुंबईत परतणार आहे. अशावेळी चाकरमानी मुंबईत येताना त्यांची रेल्वे स्थानक, एसटी डेपो तसेच मुंबईच्या इन्ट्री पॉईंटवर स्क्रिनिंग केली जाणार आहे. स्क्रिनिंगवेळी ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येतील अशांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. अशी माहिती काकाणी यांनी दिली. तसेच कोकणातून येणाऱ्या प्रवाशाला आपल्यात लक्षणे आढळून आल्यास पालिकेच्या 265 केंद्रांवर मोफत आरटीपीसीआर टेस्ट करून घेऊ शकतात असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.
संपर्कात येणाऱ्यांची पहिल्या दिवशी टेस्ट -
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या पाच दिवसांनी चाचण्या केल्या जायच्या. या नियमात बदल केले जाणार असून आता पहिल्या आणि पाचव्या दिवशी चाचण्या केल्या जाणार आहेत. यामुळे कोरोनाच्या रुग्णांवर वेळीच उपचार करून कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य होणार आहे. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, पिके पाण्याखाली..जनावरे गेली वाहून