मुंबई - सोमवारी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला जोरदार फटका बसला. या वादळामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या. मात्र, अशाच प्रकारच्या एका झाड पडण्याच्या दुर्घटनेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मालाडमध्ये घडली आहे. राजकुमार जैयसवाल असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेचे थराकाप उडवणारे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
मालाड परिसरात झाड कोसळून जखमी झालेल्या तरुणावर मृत्यू ओढवला आहे. मालाड पूर्वेला छेडा जनरल स्टोअर येथे एका वृक्षाची फांदी तुटून पडली, नेमके त्याचवेळी राजकुमार जैयसवाल हे दुचाकीवरून जाण्याच्या तयारीत होते. मात्र, ती फांदी जैयसवाल यांच्या डोक्यात पडली. या दुर्घटनेत जैयसवाल याच्या डोक्यावरील हेल्मेटचेही दोन तुकडे होऊन त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची सीसीटीव्हीतील दृष्य थरकाप उडवणारे- जैयसवाल हे दुचाकीवरून जाण्याच्या तयारीत होते. त्याच क्षणी त्यांच्या डोक्यात झाडाची फांदी कोसळते. या आघातामुळे राजकुमार दुचाकीसह खाली कोसळतात. या दुर्घटनेत राजकुमार हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यानंतर तेथील काही नागरिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. अपघातात जखमी झालेल्या जैयसवाल यांच्यावर सायन रुग्णालयात तब्बल १३ तास शस्ञक्रिया चालली. मात्र, त्याची मृत्यूशी झुंज सुरू असताना बुधवारी जैयसवाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जैयसवाल यांचा किराना मालाचा व्यवसाय होता. त्याचे आई-वडील हे अंध असून पत्नी आणि मुले उत्तरप्रदेशात वास्तव्यास असतात. राजकुमार यांच्यावर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असल्याने त्यांच्या निधनाने जैयसवाल कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.