मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राच्या चार शिलेदारांनी मंत्रीपदाची घेतली शपथ. नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि डॉ. भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून महाराष्ट्रात मंत्रिपदाची संधी दिली गेली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज केला गेला. 43 मंत्री आज या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शपथ घेतली. या 43 केंद्रीय मंत्र्यांनी पैकी महाराष्ट्रातल्या चार जणांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान देण्यात आलेले आहे. यामध्ये सर्वात पहिलं नावं नारायण राणे यांचे आहे. तर मराठवाड्यातले खासदार भागवत कराड, उत्तर महाराष्ट्रातील खासदार डॉ. भारती पवार आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार कपिल पाटील यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले आहे. या चार खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळ स्थान दिल्याने भारतीय जनता पक्षाला भविष्यात महाराष्ट्रात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार 2024 च्या निवडणुका समोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार -2024 च्या लोकसभा निवडणूक समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे यामध्ये महाराष्ट्रात नारायण राणे आणि कपिल पाटील यांच्यासारखी आक्रमक मंत्र्यांना स्थान देऊन महाविकास आघाडी सरकार आणि खास करून शिवसेनेला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. नारायण राणे आणि कपिल पाटील यांना संधी देऊन मुंबई तसेच बाजूच्या भागामध्ये शिवसेनेचे असलेलं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न चाणाक्षपणे मोदी सरकारने केला आहे. तर तिथेच मराठवाड्यात बहुजन चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंजारी समाजाच्या खासदार भागवत कराड यांना संधी दिली आहे. तर उत्तर महाराष्ट्रातून आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे डॉक्टर भारती पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जमीन तयार करण्याचं काम मोदी सरकार कडून सुरू करण्यात आले असल्याचे मतं राजकीय विश्लेषक अजय वैद्य यांनी मांडल आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात दिग्गजांना इशारा -
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री मंडळात असणाऱ्या दिग्गजांना धक्का दिला आहे. महाराष्ट्रातून तीन तर देशभरातून 12 मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. केंद्रीय सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांचे राजीनामे मंत्रिमंडळ विस्ताराआधी घेण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगदी निकटवर्तीय समजले जाणारे आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांना देखील राजीनामे द्यावे लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांवर दिलेली जबाबदारी त्यांनी चोख पार पाडावी अशी सूचना या राजीनाम्यातून पंतप्रधानांनी दिली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
खासदार नारायण राणे -
नारायण राणे हे महाराष्ट्रातले मराठा समाजाचे नेतृत्व करणारे नेते म्हणून ओळखले जातात. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण मुद्द्यावर राजकारण तापलेल आहे. राज्यात 32 टक्के मराठा समाज आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार असताना राणे कमिटीच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर वेळोवेळी मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे अशी भूमिका नारायण राणे यांनी मांडली होती. राज्यात युतीचे सरकार असताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. नारायण राणेंना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. तसेच प्रशासनावर त्यांची पकड आहे. याचा फायदा केंद्रीय मंत्रिमंडळात मोदी सरकारला होईल. नारायण राणे हे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. विरोधकांना थेट अंगावर घेण्याची धमक त्यांच्यात आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणे यांचा मोठा उपयोग भारतीय जनता पक्षाला होईल. तसेच नारायण राणे हे कोकणातले मोठे नेते आहेत. कोकणामध्ये शिवसेनेची मोठी पकड आहे ही पकड सैल करण्यासाठी नारायण राणेचा वापर भाजपाला करता येणार आहे.
खासदार कपिल पाटील -
खासदार कपिल पाटील हे आगरी समाजाचे नेते आहेत. महाराष्ट्रात ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे नेते म्हणून कपिल पाटील यांची ओळख आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या परिसरात मोठा औद्योगिक पट्टा आहे. या पट्ट्यात मोठं अर्थकारण लपलेल आहे. या सर्व भागांमध्ये आगरी समाजाचा मोठा प्रभाव असून सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी आगरी समाजाकडून केली जातेय. आगरी समाजाच्या नेत्याला मंत्रिमंडळात स्थान दिल्याने भविष्यकाळात भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच कल्याण-डोंबिवली, ठाणे या भागात शिवसेनेचे मोठे वर्चस्व आहे. 15 ते 18 आमदारांचं राजकीय भविष्य ठरवू शकतील एवढी आगरी समाजाची मते या भागांमध्ये आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कपिल पाटील यांना दिलेल्या मंत्रिपदाचा मोठा फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे.
खासदार भागवत कराड -
खासदार भागवत कराड हे मराठवाड्यातील ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे नेते आहेत. भागवत कराड हे वंजारी समाजाचे असून बहुजनांचा चेहरा म्हणून मराठवाड्यात त्यांची ओळख आहे. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय होते. भागवत कराड हे औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये दोनदा महापौर राहिलेले आहेत त्या भागातील प्रश्नांची जाण भागवत कराड यांना आहे.
खासदार डॉ. भारती पवार -
दिंडोरी मतदार संघातून खासदार डॉ. भारती पवार नेतृत्व करतात. डॉक्टर भारती पवार या आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात. उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून भारती पवार यांच्याकडे पाहिले जात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनेक वर्ष त्यांच्या कामाचा अनुभव आहे. उत्तर महाराष्ट्रात त्यांचा दांडगा संपर्क आहे. डॉ भारती पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे.