मुंबई - बुली बाई ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेल पथकाने अटक केलेली महिला आरोपी श्वेता सिंग आणि विशाल कुमार झा यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात निकाल येणार होता. मात्र, काही कारणास्तव आज निकाल येऊ शकला नाही. आता या याचिकेवर उद्या मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार असल्याची शक्यता आहे.
बुली बाई ॲप प्रकरणात प्रथम आरोपीला बेंगलोर मधून अटक करण्यात आली होती. विशाल कुमार झा या आरोपीचं नाव असून त्यानंतर उत्तराखंडमधून श्वेता सिंग आणि मयंक रावत या आरोपींना मुंबई सायबर सेलने अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात मुंबई सायबर सेलने सहा आरोपींना अटक केली आहे. श्वेता सिंग आणि विशाल कुमार झा याचा जामीन अर्ज बांद्रा कोर्टाने फेटाळला. नंतर त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. या दोन्ही आरोपींच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला असून आज निकाल येणे अपेक्षित होते. मात्र, काही कारणास्तव निकाल आला नाही. आता उद्या या याचिकेवर निकाल येण्याची शक्यता आहे.
मुंबई सायबर सेलने अर्जावर रिप्लाय सादर करत या प्रकरणात श्वेता सिंगचा या ॲपमध्ये सहभाग असल्याचे सांगण्यात आले असून या ॲप संदर्भात पूर्ण माहिती श्वेता सिंग होती. तसेच श्वेता सिंगचे विविध सोशल मीडियावर अकाउंट देखील या ॲप साठी तयार करून वापरण्यात आले होते, असा दावा मुंबई सत्र न्यायालयात मुंबई सायबर सेलने केला आहे.
बुली बाई ॲप प्रकरणात श्वेता सिंगला उत्तराखंडमधून मुंबई सायबर सेलने अटक केली होती. या प्रकरणात पहिला आरोपी विशाल झा याला बेंगलोर मधून अटक केल्यानंतर विशाल झाच्या माध्यमातून श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी 7 जानेवारी रोजी श्वेता सिंगला मुंबईत आल्यानंतर 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती.
बुली बाई एक असं ॲप्लिकेशन आहे. जिथे प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो लावले जात होते आणि त्यांची बोली लावली जात होती. या ॲपवर आतापर्यंत 102 मुस्लिम महिलांचे फोटो लावण्यात आले होते. या प्रकरणावरुन विविध स्तरांतून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. तसेच अनेकांनी या ॲप विरोधात तक्रारीही दाखल केल्या होत्या. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं या आरोपींविरोधात आयपीसी कलम 354D, 509, 500, 153A, 295A, 153B, IT च्या कलम 67 च्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास सुरु केला होता.
हेही वाचा - हैदराबादमधून आरएसएस प्रमुख मोहन भागवत LIVE