मुंबई - कोरोना महामारीमुळे यावर्षी गणेशोत्सव नेहमीप्रमाणे साजरा करता येणार नाही. कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे यावर्षी मुंबईत मिरवणूक आणि विसर्जनाच्या ठिकाणी आरती करण्यास बंदी राहणार असल्याचे पालिकेने आधीच स्पष्ट केले आहे. त्यात कोरोनाचा धोका लक्षात घेता रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी गणेश चतुर्थीपूर्वी तीन ते चार दिवस आधीच बाप्पाच्या मूर्ती आपल्या घरी आणा, आरती घरातच करा आणि बाप्पाला निरोप द्या, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
मुंबईत दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात केला साजरा केला जातो. मात्र, यावर्षी सण साजरा करण्यावर बंधने आली आहेत. शनिवार २२ ऑगस्टला बाप्पाचे आगमन होणार आहे. मुंबईत घरगुती गणपतीचे आगमन दरवर्षी प्रतिष्ठापनेच्या आदल्या दिवशी अथवा त्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर होते. परंतु, यावर्षी कोरोना संकटामुळे रस्त्यांवरील गर्दी टाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे गणेशमूर्तीचे आगमन गणेशचतुर्थीच्या तीन ते चार दिवस आधीच करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने गणेश भक्तांना केले आहे.
मुंबई शहरात ७० नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत. नैसर्गिक स्थळांवर गर्दी होऊ नये म्हणून पालिकेकडून १६७ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तर कंटेन्मेन्ट झोनमध्ये, सोसायटीच्या आवारात तात्पुरती विसर्जन स्थळे तयार करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता विसर्जन स्थळी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालिका करणार बाप्पाचे विसर्जन -
ज्यांच्या भागात कृत्रिम तलाव उपलब्ध असतील त्या १ ते २ किलोमीटरच्या परिसरातील लोकांनी कृत्रिम तलावात बाप्पाचे विसर्जन करावे. तर नैसर्गिक विसर्जन स्थळी गणेश मूर्ती विसर्जन करण्यास बंदी असणार आहे. गणेश मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली असून महापालिकेचे कर्मचारी विसर्जन करणार आहेत.
गणपती बाप्पा मोरया, घरातूनच निरोप द्या!
विसर्जनाच्या ठिकाणी आरती करण्यास बंदी असून घरीच आरती करण्यात यावी. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत संकलन केंद्रात गणेशमूर्ती जमा करावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.