मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा या तिघांना जामीन दिला आहे. या सर्वांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला आहे. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी आता ‘मन्नतवर’ होणार हे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन उद्या(29 ऑक्टोबर) तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - या कारणांमुळे आर्यनला मिळाला जामीन, मुकूल रोहतगी यांनी असा केला युक्तिवाद
आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे व ज्येष्ठ वकील देसाई हे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. तर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली.
- उद्या किंवा परवा आर्यन तुरुंगाबाहेर येणार -
आर्यन खानसह तिघांना जामीन मंजूर झाला आहे. निर्णयाची प्रत उद्या मिळणार आहे. त्यानंतर उद्या आर्यन खानसह तिघेही तुरुंगातून बाहेर येतील, असे मुकुल रोहतगी यांनी सांगितले आहे.
- न्यायालयाने दिलेल्या अटी -
तपासात अडथळा आणू नये, साक्षीदार फोडू नये, परवानगीशिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी न्यायालयात हजर राहावे आदी शर्तीवर हा जामीन देण्यात आला आहे. जामिनाची रक्कम अजून कळली नसल्याचे वकिलांनी सांगितले.
- आर्यनच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद -
गेल्या 25 दिवसांपासून तुरुंगात असलेल्या आर्यन खानच्या जामिनासाठी शाहरुख खानने खूप प्रयत्न केले. त्यासाठी आतापर्यंत तीन वकील बदलले आहेत. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्ज घेतलेले कोणतेही पुरावे सापडले नाहीत. एनसीबीने अधिकारांचा दुरुपयोग करत आर्यनला पकडले, त्याची वैद्यकीय चाचणीदेखील केली नाही, असा युक्तिवाद आर्यन खानच्या वकिलांनी केला होता. आर्यन हा शाहरूख खानचा मुलगा असल्याने हे प्रकरण तपास यंत्रणेने ताणून धरले असून, तो सर्वसामान्य मुलगा असता तर हे प्रकरण एवढं वाढले नसते, असेही वकिलांनी न्यायालयाला सांगितले. आर्यन खानला या प्रकरणात पूर्णपणे गोवण्यात आल्याचा दावा त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला होता.
- काय आहे प्रकरण?
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया या क्रुझवर एनसीबीने 2 ऑक्टोबरला छापा टाकला होता. यावेळी ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा आणि अन्य 18 जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनसह अरबाज आणि मुनमून धमेचाच्यावतीने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली.
हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील पंच किरण गोसावी याला 8 दिवसांची पोलीस कोठडी