मुंबई - मुंबईत बोगस आधारकार्ड बनवणाऱ्या टोळीचा सुळसुळाट असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. ४ हजार रुपयांमध्ये बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्या टोळीला बोरिवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शामजय लोखंडे (५१) आणि रामचंद्र धुरी (५७) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कागदपत्र न तपासता आधारकार्ड आणि पॅनकार्ड - बोरिवली परिसरात काहीजण कोणतेही कागदपत्र न तपासता आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून देत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी बनावट ग्राहकास एका झेरॉक्स सेंटरजवळ पाठवले. तेथे त्याची भेट लोखंडेशी झाली. ग्राहकाने आधारकार्ड बनवून हवे असल्याचे सांगितले. त्यानंतर लोखंडेने आधारकार्ड बनवण्यापूर्वी पॅनकार्ड बनवावे लागेल. त्यासाठी चार हजार रुपये खर्च येणार असल्याचे संबंधित बनावट ग्राहकास सांगण्यात आले.
बनावट आधारकार्ड बनवल्याचे कबुली - ४ हजार रुपयात सौदा झाल्यावर मंगळवारी लोखंडे हा बोरिवली परिसरात आधारकार्ड घेऊन आला होता. तेव्हा पोलिसांनी लोखंडेला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने बनावट आधारकार्ड बनवल्याचे कबुली दिली. त्याच्या चौकशीत धुरीचे नाव समोर आले. त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्या दोघांनी किती जणांना बनावट आधारकार्ड बनवून दिले याचा तपास बोरिवली पोलीस करत आहेत. या आरोपींकडून बनावटीकरण करण्यासाठी वापरलेला लॅपटॉप, कागदपत्रे, पेन ड्राइव्ह , मोबाईल फोन आणि ५०० रुपये जप्त केले आहेत.
आधार कार्डाच्या दुरुपयोगाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्याचवेळी बनावट आधार कार्डे तयार करण्याचेही गुन्हे उघडकीस आले आहेत. हे लोण आता मुंबईत पोचल्याचे या घटनेवरुन दिसते. पोलीस मात्र या प्रकरणामुळे सतर्क झाले आहेत. तसेच यासंदर्भात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये कदाचित मोठे मासे पोलिसांच्या गळाशी लागण्याचीही शक्यता आहे.